Thu, Jan 23, 2020 15:43
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › सभापतींना ‘बजेट’ची आठवण!

सभापतींना ‘बजेट’ची आठवण!

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:16PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यापासून महापालिकेतील प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अद्यापही अर्थसंकल्प सादर झालेला नाही. त्यातच सुमारे अर्धा मार्च महिना लोटल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींना ‘बजेट’ची आठवण झाल्याचे चित्र आहे. याबाबत सुवर्णा जाधव यांनी आयुक्‍तांना पत्र दिले असून बजेट मुदतीत मंजूर न झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

एका लिपिकासह चार अधिकार्‍यांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील तिघांना अटक झाली आहे. तर दोन अधिकारी अद्यापही पसार आहेत. अटकेच्या भीतीने काही अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून मनपाचे बजेटही रखडले आहे. वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच बजेट सादर होणे आवश्यक होते. मात्र, मार्च महिन्यातील 14 दिवस लोटले तरी अद्याप बजेट सादर झालेले नाही. बजेटच्या सभेसाठी स्थायी समिती व महासभेला किमान 7 दिवसांचा अजेंडा काढावा लागतो. सद्यस्थितीत अद्यापही स्थायी समितीकडे बजेट सादर झाले नसल्याने 31 मार्चपूर्वी बजेट मंजूर होण्याची चिन्हे नाहीत. अशातच स्थायी समितीच्या सभापतींनाही सुमारे अर्धा मार्च महिना लोटल्यानंतर ‘बजेट’ची आठवण झाली आहे. मुदतीत बजेट मंजूर न झाल्यास प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.