Sat, Aug 24, 2019 21:13होमपेज › Ahamadnagar › मालपाणी समुहाचे ‘साईतीर्थ’ धार्मिक पर्यटन केंद्र!

मालपाणी समुहाचे ‘साईतीर्थ’ धार्मिक पर्यटन केंद्र!

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:16AMसंगमनेर : प्रतिनिधी

आत्यंतिक श्रद्धेने शिर्डीत येणार्‍या भाविकांना साईदर्शनानंतर काय करावे ? हा प्रश्‍न पडतो. साईबाबांचे जीवनचरित्र व त्यांचा संदेश नेमका काय होता, या विषयीची माहिती पुस्तकांखेरीज अन्य माध्यमातून मिळत नाही. आलेल्या पर्यटकांना मनोरंजनाचे अन्य साधन शिर्डीत उपलब्ध नाही. अशा प्रश्‍नांचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे मालपाणी उद्योग समुहाने उभारलेला धार्मिक थीमपार्क ‘साईतीर्थ’ होय.

वेट-एन-जॉय वॉटरपार्कच्या समोर, मंदिरापासून अवघ्या पाचच मिनिटांच्या अंतरावर सहा एकरांच्या भव्य प्रांगणात या थीमपार्कची उभारणी करण्यात आली आहे. साईतीर्थच्या प्रांगणात प्रवेश करताना पुरातन वास्तूशिल्पांचा नमूना वाटावा, असे महाद्वार व कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भव्य सूर्यरथाच्या चक्राची चाळीस फुटी प्रतिकृती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
‘साईतीर्थ’ या थीमपार्कमध्ये मुख्य चार आकर्षण आहेत. साईबाबांची सुप्रसिद्ध द्वारकामाई हे पहिले आकर्षण. लंडनच्या विश्‍वविख्यात कंपनीने रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून बनविलेल्या साईबाबा व त्यांच्या भक्तांच्या हलत्या प्रतिमा म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यात्मिक वापर आहे, असेच म्हणावे लागेल.

थीमपार्कचे दुसरे आकर्षण म्हणजे 72 फुटी विशाल रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा ‘सबका मालिक एक’ हा माहितीपट. सुमारे एक तासाचा हा सिनेमा साईबाबांचे शिर्डीतील प्राकट्य आणि महासमाधी या मधल्या कालखंडाला जिवंत करणारा एक सर्वांग सुंदर कलाविष्कार आहे. साईबाबांची लीला, त्यांनी घडवलेले चमत्कार आणि उदास-हताश मनाला बाबांनी दिलेली नवप्रेरणा याचे दर्शन या माहितीपटात आहे.

शिर्डीत येणार्‍या भाविकांना भारतीय संस्कृतीचे व वाड्मयाचे दर्शन व्हावे, या हेतूने ‘लंका दहन’ हा  5 डी सिनेमा या थीमपार्कचे तिसरे आकर्षण आहे. 

थरथरणार्‍या प्रेक्षकगृहात, हलणार्‍या खुर्च्या, अंगावर प्रत्यक्ष पडणारा पाऊस, प्रेक्षकगृहात अनुभवायला मिळणारा वादळ-वारा आणि त्याच्या जोडीला पडद्यावर चालणारा 5 डी चित्रपट म्हणजे तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा अप्रतिम संगम आहे. हनुमानाच्या समुद्र उड्डाणापासून ते लंका दहानापर्यंतचा प्रवास क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके आणि मनातली उत्कंठा वाढवणारा आहे.

‘टेंपल राईड’ अर्थात ‘तीर्थयात्रा’ हे चौथे आकर्षण पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सवर चालणार्‍या बोटीत स्वार व्हावे लागते. गेट वे ऑफ इंडियातून प्रवेश करून भारतातील विविध प्रांतातला प्रवास या राईडमध्ये घडतो. भारतातील महत्त्वाच्या दहा मंदिरांची तीर्थयात्रा या सफरीत घडते. प्रत्येक मंदिराचा परिसर, तिथली दृष्य, सभोवतालचे आवाज, लोकांची वेशभूषा, संस्कृती पाहत त्या मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत दर्शकाला नेले जाते. सरते शेवटी ही तीर्थयात्रा शिर्डीत येते. होलोग्राफी टेक्नॉलॉजीचा वापर करुन प्रकट होणारी साईंची आशीर्वाद देणारी प्रतिमा प्रत्यक्ष साई-सान्निध्याचा अनुभव देते.

पर्यटकांच्या सोयीसाठी सुसज्ज रेस्टॉरंट आणि सोव्हिनिअर शॉपस् हे देखील या थीमपार्कचे वैशिष्ट्य आहे. मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनिष मालपाणी यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या या थीमपार्कला राजीव जालनापूरकर व संजय दाबके यांच्या गार्डियन कंपनीचे सहकार्य लाभले आहे. 

साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डीत साकारलेले हे साईतीर्थ भारतातील धार्मिक पर्यटनाचा उत्कृष्ट नमूना ठरेल, असेच आहे.- डॉ.संजय मालपाणी, संगमनेर