Sun, May 19, 2019 14:28
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पाणीयोजना वीजबिलाच्या संकटात 

पाणीयोजना वीजबिलाच्या संकटात 

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:34PMशेवगाव : रमेश चौधरी

शेवगाव-पाथर्डी योजनेसह तालुक्यातील प्रादेशिक पाणी योजना वीज बिलाच्या संकटात सापडल्या असून, कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होणार असल्याने वाढत्या तापमानात पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. शहरटाकळी पाणी योजनेचा वीज पुरवठा थकबाकी अभावी कायमस्वरुपी बंद करण्यात आल्याने त्याभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानात तीव्र उष्णतेला सामोरे जाताना नागरीक कासावीस होत आहेत. जास्तीत-जास्त पाण्याचा वापर करून नागरीक उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाणीयोजना नसलेल्या गावात पाण्याची अडचण निर्माण होत चालली आहे.  सार्वजनिक विहिरी, बोअर, हातपंप, खासगी विहिरी यांची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.

शेवगाव-पाथर्डी व 54 गावे, बोधेगाव 7  गावे या चालू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या संकटात सापडल्याआहेत. बिलाची रक्कम अदा झाली नाहीतर त्यांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत होणार असल्याने लाभार्थी गावावर पाणी टंचाईचे सावट येण्याची शक्यता आहे. शेवगाव-पाथर्डी योजनेची 1 कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. पैकी अर्धी रक्कम भरणे क्रमप्राप्त झाले आहे. ही योजना चालू राहावी म्हणून पाणीपुरवठा विभागाने सक्तीची वसुली चालू केली आहे. त्यासाठी थकबाकी असणार्‍या काही गावांचा पाणीपुरवठा प्रशासन पातळीवर लवकरच बंद करण्यात येणार आहे. वीजबिल भरण्याइतपत रक्कम उपलब्ध होणे गरजेचे आहे, अन्यथा वीज पुरवठा खंडित झाल्यास 1 लाख 51 हजार 480 लाभार्थ्यांवर पाण्याचा मोठा प्रश्‍न ठाकणार आहे. 

या योजनेतंर्गत पाथर्डी नगरपरिषदेने आपली संपूर्ण पाणीपट्टी अदा केली आहे. शेवगाव नगरपरिषदेकडे जवळपास दीड कोटी रुपये थकीत आहेत. काही गावांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. बोधेगावसह 7 गावच्या प्रादेशिक योजनेची 1 कोटी 9 लाख थकबाकी आहे. याचेही काही प्रमाणात बिल अदा झाले नाहीतर वीज पुरवठा खंडीत होऊन ही योजना बंद होणार आहे. परिणामी 36 हजार नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. शहरटाकळीसह 26 गावच्या प्रादेशिक योजनेची 1 कोटी 56 लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. ही वसुली होण्याची शक्यता नसल्याचे गृहीत धरून या योजनेचा कायमस्वरुपी विद्युत पुरवठा गेल्या तीन आठवड्यांपासून खंडीत करण्यात आला आहे.

शहरटाकळी योजनेतंर्गत 41 हजार नागरिकांना पाण्याचे सावट निर्माण झाले आहे. यातील काही गावे जायकवाडी फुगवट्याच्या क्षेत्रात येतात तेथे पाण्याची उपलब्धता होऊ शकते, मात्र काही गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. त्यात प्रादेशिक योजणा असणार्‍या गावांना शासन टँकरने पाणीपुरवठा करीत नाही. दरम्यान, ऐन अन्हाळ्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ नये म्हणून वीजबील थकबाकी भरणे आवश्यक असल्याने पाणीपट्टी बाबत लाभार्थींनी सहकार्य करण्याचे अवाहान प्रशासनाने केले आहे.

Tags : Ahmadnagar, Regional, water, scheme, problem,  electricity, bill