Sat, Apr 20, 2019 10:00होमपेज › Ahamadnagar › काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन; भाजपा-शिवसेनेवर घेतले तोंडसुख

महागाई, इंधनाचे दर तात्काळ कमी करा

Published On: Sep 11 2018 1:35AM | Last Updated: Sep 11 2018 12:08AMनगर : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने भारत बंदची हाक दिली. या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जिल्हाभरातील सर्व  विरोधी पक्षांनी प्रतिसाद देत या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. वाढती महागाई व इंधनाचे दर तात्काळ कमी करावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत, धरणे आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचे भाव 40 टक्क्यांनी कमी झालेले असताना देखील, देशभरात पेट्रोल व डिझेल दरांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेला जगणे अवघड झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराच्या निषेधार्थ काँग्रेसने काल (दि.10) भारत बंदची हाक दिली.  या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व इतर पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद देत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन केले. 

या आंदोलनात आ. संग्राम जगताप, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी महापौर अभिषेक कळमकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ,  उबेद शेख, संजय झिंजे,  बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, गौरव ढोणे, निखिल वारे, रॉबीन साळवे, अ‍ॅड. आर. आर. पिल्ले,  साहेबान जहागीरदार, सोमनाथ धूत, अ‍ॅड.शारदा लगड, किसनराव लोटके, रेखा जरे, सुनीता बागडे, रजनी ताठे, शारदा वाघमारे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी झालेल्या सभेत सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. जनतेचा विश्‍वासघात करून निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केले. प्रदेश सरचिटणीस देशमुख यांनी देखील लबाडांना पायउतार करण्यासाठी एक व्हावा, असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे विधाते, माजी महापौर कळमकर, अशोक गायकवाड, अंबादास गारुडकर व सचिन डफळ आदींनीही मनोगत व्यक्‍त  करीत भाजपा व शिवसेनेवर तोंडसुख घेतले. 

पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढलेले दर तातडीने मागे घ्यावेत. पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर, विविध अधिभार कमी करावेत, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत केंद्र सरकार गंभीर असेल, तर तातडीने तसा निर्णय घेण्यात यावा, या तीन प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले.  या मागण्यांवर तात्काळ  सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन केले छेडले जाईल, असा इशारा केंद्र व राज्य सरकारला देण्यात आला आहे.