Tue, Jul 16, 2019 22:30होमपेज › Ahamadnagar › तीन महिन्यांतच झाली चक्क वर्षभराची वसुली!

तीन महिन्यांतच झाली चक्क वर्षभराची वसुली!

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 03 2018 10:20PMनगर : प्रतिनिधी

मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी मागील काळात वर्षभरात होणार्‍या 40 ते 42 कोटींच्या वसुलीचा उच्चांक यंदा महापालिकेने तीन महिन्यातच मोडला आहे. ‘शास्तीमाफी’ची सवलत, नियमित करदात्यांचे सहकार्य आणि 11 जूननंतर सुरु झालेल्या जप्ती मोहिमेमुळे जून महिन्याअखेर मनपाने तब्बल 43.06 कोटींचा कर वसूल केला आहे. यात 23.78 कोटींच्ता थकबाकीचा तर 19.27 कोटींच्या नियमित वर्षाच्या कराचा समावेश आहे.

2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकीसह एकूण 234.32 कोटींची मागणी आहे. यात 192.23 कोटींच्या थकबाकीचा तर 42.08 कोटींच्या चालू कर आकारणीचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात आयुक्‍तांनी शास्तीमाफीची योजना जाहीर करत 11 मेपर्यंत शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिली होती. तर एप्रिल महिन्यात कर भरणार्‍या नियमित करदात्यांना सर्वसाधारण करात नियमानुसार 10 टक्के सूट दिली जाते. या दोन्ही सवलतींमुळे 11 मेपर्यंत 32.37 कोटींची वसुली झाली होती. तर 11 जून अखेर 39.77 कोटींची वसुली झाली होती. यात आता आणखी 3 कोटींची भर पडली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टीची वर्षभरात 9 ते 11 कोटींची वसुली होते. यंदा तीन महिन्यातच 9.01 कोटींची वसुली झाली आहे.

चालू वर्षात मनपाने सुरुवातीलाच शास्तीमध्ये सवलत दिली होती. त्यामुळे वसुलीत वाढ होण्यास मदत झाली असली तरी तीन महिन्यात मनपाने तब्बल 5.41 कोटींची शास्तीही वसूल केली आहे. दरम्यान, वृक्ष करापोटी मनपाला 31.16 लाख रुपये मिळाले आहेत. तर अवैध बांधकामांवरील शास्तीपोटी मनपाला 1.24 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.

कर वसुलीतील 5.40 कोटी शासनाकडे!

महापालिकेकडून वसूल केल्या जाणार्‍या करामधील शिक्षण कर व रोजगार हमी कराची रक्कम महापालिकेला शासनाकडे जमा करावी लागते. मनपाच्या 43.06 कोटींमध्ये शिक्षण करापोटी 4.72 कोटी तर रोजगार हमी करापोटी 67.81 लाखांच्या रकमेचा समावेश आहे. त्यामुळे एकूण 5.40 कोटींची रक्कम मनपाला शासनाकडे वर्ग करावी लागणार आहे.