Wed, Feb 20, 2019 16:51होमपेज › Ahamadnagar › वाळू तस्करांकडून केला तीन कोटी रुपये दंड वसूल 

वाळू तस्करांकडून केला तीन कोटी रुपये दंड वसूल 

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 10:40PM

बुकमार्क करा
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

जिल्ह्यात  वाळू तस्करांच्या विरोधात महसूल प्रशासनाने मागील वर्षात जोरदार मोहीम राबविली. 31 डिसेंबरअखेर करण्यात आलेल्या कारवाईत वाळूची चोरटी वाहतूक करणारी तब्बल 706 वाहने पकडण्यात आली. त्यांच्याकडून 2 कोटी 93 लाख रुपयांंचा दंड प्रशासनाने वसूल केला. यामध्ये सर्वाधिक 48 लाख 18 हजार रूपयांचा दंड श्रीगोंदा तालुक्यात वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाळूची तस्करी करणारी सर्वाधिक 133 वाहने संगमनेर तालुक्यात  पकडण्यात आली. त्याकडून 41 लाख 98 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  नेवासा तालुक्यात मात्र अवघी चार वाहने पकडण्यात आली. नगर तालुक्यात 38 लाख,  नेवासा  1 लाख  68 हजार शेवगाव  8 लाख  9 हजार, श्रीगोंदा  48 लाख 18 हजार, पारनेर  35 लाख  16 हजार, संगमनेर  41 लाख  98 हजार , अकोले 4 लाख  52 हजार,  कोपरगाव 32 लाख 33 हजार,  राहाता  9 लाख  32 हजार , श्रीरामपूर  10 लाख  90 हजार, राहुरी  23 लाख  53 हजार,  कर्जत  20 लाख 22 हजार, जामखेड 6 लाख  98 हजार  रूपये, असा दंड वाळू तस्करांकडून वसूल करण्यात आला आहे .

जिल्ह्यात वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत. वाळू तस्करांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शासनाला गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना आदी नद्यांतील वाळूसाठ्यांच्या लिलावातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र, अलिकडे वाळू लिलावात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून, बेकायदा वाळू उपशातून मिळणारी दंडाची रक्कमही वाढली आहे. 

कारवाई सुरुच राहणार

जिल्ह्यात वाळू तस्करांवरील कारवाईत श्रीगोंदा तालुका आघाडीवर आहे. या पुढील काळातही वाळू तस्करांवर कारवाईची मोहीम प्रभावीपणे सुरुच राहणार आहे. जास्तीतजास्त कारवाया करून वाळू तस्करीला आळा घालण्याचा महसूल प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले.