Tue, Jul 16, 2019 21:45होमपेज › Ahamadnagar › पठारावर झाली वाटाण्याची विक्रमी पेरणी

पठारावर झाली वाटाण्याची विक्रमी पेरणी

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 05 2018 10:55PMकान्हूरपठार ः वार्ताहर  

वाटाण्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कान्हूरपठारसह पठार भागातील गावांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात वाटाण्याची विक्रमी पेरणी झाली आहे. अजूनही पेरणी सुरूच असू, आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. 

दोन आठवड्यांपूर्वी पठार भागात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसावर बहुतांशी शेतकर्‍यांनी अवघ्या 45 दिवसांत हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून वाटाण्याची पेरणी सुरू केली. मागील वर्षी पेक्षा यंदा वाटाणा बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकर्‍यांची पिकासाठी आर्थिक गुंतवणूकही वाढली. असे असले, तरीही पठारावरील कान्हूरपठार, करंदी, काकणेवाडी, गारगुंडी, विरोली, वेसदरे, भोंद्रे, वडगावदर्या, पिंपळगाव रोठा, कारेगाव, अक्कलवाडी, पिंप्री पठार, पिंपळगाव तुर्क, किन्ही आदी गावांत वाटाण्याला पसंती देत शेकडो टन वाटाणा बियाण्याची  विक्रमी पेरणी झाली. त्यामुळे इतर पिकांमध्ये मूग, बाजरी, वाल, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे क्षेत्र कमालीचे घटले. 

यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा झाल्याने दोन आठवडे पेरण्या लांबल्या. पाऊस झाल्यानंतर ज्यांनी पेरणी केली आहे, त्यांचा वाटाणा आता  उगवून आला आहे. सध्या परिसरात पावसाच्या अधून मधून हलक्या सरी पडत असल्याने वाटाणा  तग धरुन आहे. त्यामुळे परिसराला मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात पीक वाया जाण्याचा धोकाही होऊ शकतो. मागील वर्षी गुजरातच्या व्यापार्‍यांनी येथे येऊन वाटाणा खरेदी करून चांगला भाव दिला होता. काहींनी नेहमीप्रमाणे मुंबई, पुणे, ओतूर येथे वाटाणा पाठविला होता. लवकरच चांगला पाऊस झाला व वाटाण्याचे चांगले उत्पादन झाले, तर पठारावर चांगली आर्थिक उलाढाल होईल, असे बोलले जाते.

इतर पिकांना मिळणारा कमी भाव, वाढती मजुरी, पिकासाठी लागणारा कालावधी, यामुळे ही पिके सोडून शेतकरी वाटाण्यासाठी लागणारा कमी कालावधी, चांगला भाव, वर्षभराचे जुळणारे आर्थिक गणित, मुंबई, ओतूर, गुजरात येथून असलेली मागणी, यामुळे पठारावरील शेतकरी वाटाण्याकडे वळाला असल्याचे प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब सोनावळे, कानिफनाथ ठुबे, प्रकाश ठुबे यांनी सांगितले.