Sat, Mar 23, 2019 12:17होमपेज › Ahamadnagar › पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त

पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 10:35PMशेवगाव : प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना बोंडअळी अर्थसहाय्याचे पहिल्या टप्यात 8 कोटी 75 लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले असून लवकरच ते शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.सन2017 मधे तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर कपाशी पीक घेण्यात आले होते. पंरतु बोंडअळीचा प्रार्दूभाव होऊन या पिकाचे सर्वत्र नुकसान झाले. याबाबत तक्रारी झाल्या. अधिवेशनातही यावर चर्चा झाल्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्यानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले. आता हे अनुदान मंजुर झाले असून शेवगाव तालुक्यातील 57 हजार 505 शेतकर्‍यांचे 47 हजार 192 हेक्टर क्षेत्र 33 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित झाल्याने 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे 41 कोटी 7 लाख 268 रुपये एवढे अनुदान मंजुर झाले असून पहिल्या हप्त्यात 13 कोटी 55 लाख 398 रुपये देण्यात आले. पैकी पाहिल्या टप्प्यात 8 कोटी 75 लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. बाधित पीक उत्पादक शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक तपासून हे अनुदान तीन आठवड्यांत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

तालुक्यात 57 हजार 505 शेतकर्‍यांचे 47 हजार 192 हेक्टर कपाशी क्षेत्र हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले होते. त्यातील 54 हजार 609 शेतकर्‍यांचे 41 हजार 466 हेक्टर क्षेत्र दोन हेक्टर पेक्षा कमी आहे तर 2 हजार 896 शेतकर्‍यांचे 5 हजार 726 हेक्टर क्षेत्र दोन हेक्टर पेक्षा जास्त आहे. सरसकट मदतीनुसार 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टर मदतीसाठी 32 कोटी 9 लाख 9 हजार 952 रुपये निधीचा प्रस्ताव प्रशासनाने शासन दरबारी दाखल केला होता. जिल्ह्यात सर्वात जास्त अनुदान हे शेवगाव तालुक्यासाठी मंजूर झाले असून त्यातून शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

शेवगाव तालुक्यात शेवगाव मंडळ 10 हजार 833 शेतकरी 9 हजार 617 हेक्टर क्षेत्र, चापडगाव 11 हजार 52 शेतकरी 8 हजार 145 हेक्टर क्षेत्र, एरंडगाव 5 हजार 700 शेतकरी 4 हजार 508 हेक्टर क्षेत्र, बोधेगाव 16 हजार 108 शेतकरी 15 हजार 259 हेक्टर क्षेत्र, ढोरजळगाव 6 हजार 973 शेतकरी 5 हजार 472 हेक्टर क्षेत्र, भातकुडगाव 6 हजार 839 शेतकरी 4 हजार 190 हेक्टर असे मंडळ निहाय कपाशी क्षेत्र बाधीत आहे. टप्प्या-टप्प्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हे अनुदान बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे.जिल्ह्यासाठी 157 कोटी 23 लाख 148 रुपये अनुदान मंजुर झाले आहे. पहिला हप्ता 51 कोटी 88 लाख 639 रुपये आहे. पैकी पहिल्या टप्यात 33 कोटी 49 लाखाचे वितरण झाले असून सर्वात जास्त शेवगाव तालुक्यासाठी तर सर्वात कमी म्हणजे अनुदानच नाही, असा अकोला तालुका आहे.