होमपेज › Ahamadnagar › 1 कोटी 40 लाखांचा निधी मिळेना

1 कोटी 40 लाखांचा निधी मिळेना

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठी जिल्हा पातळीवर निवडलेल्या 14 गावांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी गावांची निवड होऊनही चार महिने झाले तरी हा 1 कोटी 40 लाखांचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे निधीची घोषणा करून प्रत्यक्षात फक्त नावासाठीच तर हे पुरस्कार दिले गेले नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील 14 गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहेत. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून प्रत्येकी 1 अशा 14 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली. मात्र निवड होऊनही या गावांना निधी देण्यात न आल्याने निधी देण्याची शासनाची घोषणा कागदावरच राहिली आहे.राज्यातील गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली आहे.

या योजनेसाठी गावांची निवड करताना 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी / पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर, असे गुणांकन झाले. जिल्ह्यातील 301 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदविला. या 301 ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय समितीने पाहणी करून गुणांकन केले. गुणांकनात सर्वात जास्त गुण असलेल्या 25 टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. समितीने 25 टक्के निवड केलेल्या गावांमधून 14 गावांची निवड स्मार्ट ग्राम मध्ये केली. योजनेत समाविष्ठ झाल्यास निधी मिळेल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र फक्त प्रमाणपत्रच मिळाले आहे.

निधीपासून वंचित स्मार्ट ग्रामपंचायती

अकोले - धुमाळवाडी, संगमनेर - गुंजाळवाडी, कोपरगाव - भोजडे, राहाता - रुई, श्रीरामपूर - खंडाळा, राहुरी - गणेगाव, नेवासा - गोगलगाव, शेवगाव - ठाकूर पिंपळगाव, पाथर्डी - लोहसर, जामखेड - सातेफळ, कर्जत - निमगाव गांगर्डा, श्रीगोंदा - कौठा, पारनेर - जामगाव व वडनेर बु. विभागून, नगर - मांजरसुंबा.