Thu, May 23, 2019 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › शेवगाव नगराध्यक्षांच्या विरोधात बंड!

शेवगाव नगराध्यक्षांच्या विरोधात बंड!

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 08 2018 12:16AMनगर : प्रतिनिधी

शेवगाव नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. भाजपाचे आठ व एका अपक्षाला बरोबर घेत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्‍का मानला जात आहे.

शेवगाव नगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमच 21 जांगासाटी निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9,  भाजपाचे 8 व 4 अपक्ष नगरसेवक निवडून आले. यातील तीन अपक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली. 7 फेब्रुवारी 2016 रोजी प्रथम नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या विद्या लांडे विराजमान झाल्या. नगराध्यक्षा विद्या लांडे यांचा पुढे एकहाती अंमल सुरु झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांत मोठ्या प्रमाणात नाराजी वाढू लागली. 

त्यानंतर राष्ट्रवादी नगरसेवकांसह अपक्ष व भाजपा नगरसेवकांनी नगराध्यक्षा लांडे यांच्या विरोधात बंड सुरु केले. अपक्ष नगरसेवक सागर फडके यांच्या नेतृत्वाखाली नवीन गटनेतेपदासाठी 27 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याची सुनावणी व पडताळणी होऊन 18 एप्रिल 2018 रोजी नगरसेवक सागर फडके यांची गटनेतेपदी निवड झाली. 

त्यानंतर मात्र नगराध्यक्षा लांडे यांच्या विरोधातील अंतर्गत वाद अधिकच पेटत गेला. काल (दि.7) राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी भाजपाचे आठ व अपक्ष एक यांना बरोबर घेत एकूण 15 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे विद्यमान नगराध्यक्षा लांडे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. 

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी 15 नगरसेवकांची ओळखपरेड घेतली. यामध्ये वर्षा लिंगे, इंदूबाई म्हस्के, शब्बीर शेख, सागर फडके, अजय भारस्कर, विकास फलके, वजीर पठाण, राणी मोहिते, रेखा कुसळकर, अरुण मुंडे, नंदा कोरडे, सविता दहिवाळकर, अशोक आहुजा, कमलेश गांधी व शारदा काथवटे आदी नगरसेवकांचा समावेश आहे.