Fri, Mar 22, 2019 01:36
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › राज्यभरात कुठेही घेता येणार आता रेशनचे धान्य!

राज्यभरात कुठेही घेता येणार आता रेशनचे धान्य!

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:17PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक केल्यानांतर त्याचे फायदे आता समोर येऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे कामानिमित्त दुसर्‍या गावात, शहरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होणार्‍या नागरिकांना राज्यातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य मिळणार आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत ही प्रणाली सुरु होणार असल्याने, ऊसतोड मजुरासारख्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांनी दिली.

राज्य शासनाकडून आधार आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगार, वीटभट्टी कामगार आदी स्थलांतरित कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील कुठल्याही रेशन दुकानात अंगठा टेकवून धान्य घेता येणार आहे.

जिल्ह्यात 1 हजार 878 दुकानांपैकी 1 हजार 863 रेशनदुकानात धान्य वितरण करण्यासाठी ‘पॉस मशिन’ बसवण्यात आल्या आहे. या बायोमेट्रिक प्रणालीद्वारे जिल्ह्यात धान्य वितरण केले जाते. कारभारात अधिकाधिक पारदर्शकता यावी, सर्वसामान्य नागरिक धान्य घेण्यापासून वंचित राहू नये हा प्रणालीचा उद्देश आहे.

आधार कार्डवर आधारित या प्रणालीद्वारे धान्य घेण्यासाठी जर एखाद्याकडे आधार नसेल तर, पुरवठा विभागाचा कर्मचारी त्याची ओळख पटवून धान्य देणार आहे. जिल्ह्यात आधार नोंदणी झालेले 91 टक्के ग्राहक असून, आधार नोंदणीत जिल्हा राज्यात 7 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 856 दुकानांमध्ये 6 जुलैपासून बायोमेट्रिक धान्य वितरण प्रणाली राबविण्यासाठी प्रशासन सुरूवात करण्यात आली होती. 

नगर शहरात रेशन दुकानांची संख्या 91 आहे. आधार आधारित सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होत आहे. या प्रणालीद्वारे दुकानदारांना कॅशलेस पध्दतीने व्यवहार करता येतो. त्यात दुकानदारांना रिचार्ज, तिकीट बुकिंग, प्रवास बुकिंग, धान्याचे पैसेही शासनाला ऑनलाइन भरता येते. यामुळे धान्य दुकानदारांना जोडधंदा उपलब्ध होत आहे. त्यामुळे दुकानदारांचे कमिशन वाढले आहे.