Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Ahamadnagar › मराठा समाजातर्फे रास्तारोको

मराठा समाजातर्फे रास्तारोको

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 10:14PMकर्जत : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे नगर-सोलापूर रस्त्यावर माहीजळगाव येथे सुमारे तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला तमीळनाडू राज्याप्रमाणे कायद्यात बदल करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अ‍ॅड. श्रीहर्ष शेवाळे यांनी केली. यावेळी किरण पाटील, शिवसेना नेते संजय शेटे, बाळासाहेब सपकाळ, सरपंच नाना तोरडमल, सचिन शेटे, डॉ. राजेश तोरडमल, उपसरपंच नारायण शिंदे, श्रीमंत कदम, राजेंद्र खेडकर, संतोष कुरुळे, प्रवीण खेडकर, मच्छिंद्र खेडकर, गहिनाथ काकडे, गोकुळ इरकर, खंडेराव गायकवाड, संतोष शेटे, किशोर कदम, किशोर कोपनर, सावन शेटे, अभिषेक शेटे, विष्णू खेडकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी रस्त्यावर टायर टाकून जाळण्यात आले. त्यानंतर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. माहिजळगाव येथे काल (दि.26) आठवडे बाजारचा दिवस होता. ग्रामस्थांनी बाजार बंद ठेवला. याशिवाय गावातील बँक व शाळा देखील बंद होत्या. माहिजळगाव येथे सलग दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. काल येथे शहीद काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी बोलताना श्रीहर्ष शेवाळे म्हणाले, आपल्याच देशातील तमीळनाडू राज्याने आरक्षणाचा कायदा 50 टक्के असताना विधानसभेमध्ये ठराव करून आरक्षण 69 टक्के केले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून राज्यामध्ये आरक्षण वाढवावे. 

यावेळी डॉ. राजेश तोरडमल म्हणाले, आज मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. त्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत. शिक्षण असले, तरी नोकरी लागत नाही. त्यामुळे आता आम्हालाही आरक्षणाची गरज आहे. किरण पाटील म्हणाले, आज राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर रस्त्यावर उतरला आहे. मात्र देशातील व राज्यातील भाजप सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. बाळासाहेब सपकाळ, अमोल बामणे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी निवेदन देण्यात आले.