Thu, Mar 21, 2019 11:46होमपेज › Ahamadnagar › थेंबभरही पाणी देणार नाही

थेंबभरही पाणी देणार नाही

Published On: Apr 18 2018 1:43AM | Last Updated: Apr 18 2018 12:07AMतळेगाव दिघे : वार्ताहर

अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला आपणच पाणी देणार आहोत. शिर्डी व कोपरगावने गोदावरी खोर्‍यातील आरक्षित पाण्यातून पाहिजे, तेवढेे पाणी न्यावे. दुष्काळग्रस्तांचे निळवंडेचे एक थेंबभरही पाणी कुठे जाऊ देणार नाही, असे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितले.

निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीतर्फे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर काल सकाळी आयोजित रास्तारोको आंदोलनात ते बोलत होते. 

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, इंद्रजित थोरात, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे पाटील, बाबा ओहोळ, रामदास वाघ, सभापती निशा कोकणे, भाऊसाहेब कुटे, शिवाजी थोरात, साहेबराव गडाख, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच अनिल कांदळकर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा आहे. त्यासाठी तातडीने कालव्यांची कामे सुरू करावीत. निळवंडे धरणाच्या कामात काहींनी खुट्या घातल्या. याकामी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मोठी साथ दिली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करून धरण पूर्ण केले. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना आपण सन्मानाने नोकर्‍या दिल्या. शेजारच्यांनी मात्र त्यांना हाकलून लावण्यासाठी फरशा पुसायचे काम दिले, असे सांगून कोपरगाव व शिर्डीसाठी गोदावरी खोर्‍याचे पाणी आरक्षित आहे, तेथून त्यांनी पाणी घ्यावे. आमचं पाणी कमी करून निळवंडेच पाणी मिळणार नाही. निळवंडेचे कालवे पूर्ण करण्यासाठी राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय हक्काचे पाणी मिळणार नाही, असे ठणकावून त्यांनी याप्रश्‍नी आंदोलनाचा एल्गार पुकारला.
आ. डॉ. तांबे, बाबा ओहोळ, महेंद्र गोडगे पाटील, सरपंच बाबासाहेब कांदळकर, रमेश दिघे, गणपत सांगळे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, राजेंद्र भडांगे यांची भाषणे झाली. 

पाटपाणी संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पाटबंधारे विभागाच्या संगीता जगताप व रवींद्र बागूल यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले.

दरम्यान, निळवंडेचे अनेक शत्रू असले तरी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी याकामी सदैव मदत केली. अकोले तालुक्यात कालवे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण जाऊन त्यांना विनंती करू. त्यांची नेहमीच मदतीची भूमिका असते. ते नक्कीच सहकार्य करतील, असेही आ. थोरात यांनी नमूद केले.

 

Tags ; ahamadnagar, ahamadnagar news, Talegaon Dighe,  Rastaroko Movement,