Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Ahamadnagar › नगराध्यक्षपदी भाजपाच्या मोहिते; उपनगराध्यक्षपदी शेख, राष्ट्रवादीला धक्का

शेवगाव पालिकेत सत्तांतर

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 12:45AMशेवगाव : प्रतिनिधी 

शेवगाव नगरपरिषदेत सत्ताबदल झाला असून राष्ट्रवादीचे होम ग्राऊंड असणार्‍या या नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदी भाजपाच्या राणी मोहिते, तर उपनगराध्यक्षपदी वजीर पठाण यांची निवड झाली आहे.

शेवगावच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी काल (दि. 1) पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या उपस्थित नगरसेवकांची विशेष सभा झाली. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षीत होते. या पदासाठी राष्ट्रवादीच्या विजयमाला कैलास तिजोरे, तर भाजपाच्या राणी विनायक मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तिजोरे यांना 9, तर मोहिते यांना 12 मते मिळाली. 

याचवेळी उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने या पदासाठी राष्ट्रवादीने सागर फडके यांना उमेदवारी दिली. भाजपाचे शारदा काथवटे, कमलेश गांधी, सहयोगी सदस्य वजीर पठाण यांनी अर्ज दाखल केले. काथवटे व गांधी यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादीचे सागर फडके आणि भाजपा सहयोगी सदस्य वजीर पठाण यांच्या निवडणूक झाली. फडके यांना 9, तर पठाण यांना 12 मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

सभागृहात भाजपा 8, राष्ट्रवादी 9, अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने तीन अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. यावेळी मात्र हा डाव पलटला. उपनगराध्यक्ष झालेले अपक्ष नगरसेवक वजीर पठाण हे भाजपाचे सहयोगी सदस्य झाले. राष्ट्रवादीचे उमर शेख, शब्बीर शेख, अजय भास्कर हे नगरसेवक भाजपात सामील झाले. ज्ञानेश्वर कारखाना कार्यस्थळावर माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी राष्ट्रवादीसह काही अपक्ष नगरसेवकाची बैठक घेतली होती. पदाधिकारी निवडीसाठी आपल्याकडे संख्याबळ असल्याचे गृहीत धरुन त्यांनी उपनगराध्यपदाचा उमेदवार जाहीर केला. मात्र यातील तीन नगरसेवकांना हा निर्णय मान्य झाला नसल्याने त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. ते थेट भाजपाच्या गोटात दाखल होऊन दुपारी नाट्यमय घडामोडी झाल्या आणि भाजपाला सत्तेचा मार्ग सुकर झाला.

भाजपात सहभागी झालेल्या नगरसेवकांना पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांसह माजी नगराध्यक्षा विद्याताई लांडे यांनी अटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी सत्ता गमवावी लागली.

समाजाचा निर्णय पाळला

वजीर पठाण, शब्बीर शेख, उमर शेख यांनी समाजाने दिलेला निर्णय मानला. त्यासाठी भाजपाने शब्द पाळला. त्यामुळे निवड होताच जमा झालेल्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी विजयाचा जल्लोश केला.