Sun, Oct 20, 2019 01:44होमपेज › Ahamadnagar › दिव्यांग विद्यार्थिनींचे कारागृहात रक्षाबंधन

दिव्यांग विद्यार्थिनींचे कारागृहात रक्षाबंधन

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 10:56PMनगर ः प्रतिनिधी

जानकीबाई आपटे मूकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थीनींनी सबजेल मध्यवर्ती कारागृहामधील बंदीवानांना राख्या बांधल्या. ‘तुमच्या रुपानं बहिणीची कमी भरून निघाली,’ असे म्हणून सगळ्याच बंदीवानांचे डोळे भरून आले.  कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या संकल्पनेतून हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.

शेडगे म्हणाले की, कारागृहाच्या ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ या ब्रीद वाक्यानुसार बंदिवानांच्या रोजीरोटीचे पुनर्वसन करण्यापलिकडे त्यांच्या विचारांचेही पुनर्वसन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्यातून अनेक बंदिवान प्रेरणा घेतात. या उपक्रमामुळे यांना आणखी प्रेरणा मिळणार आहे.

एका दिव्यांग विद्यार्थीनीने ही मनोगत व्यक्त केले. ‘आम्ही तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू, बाहेर आल्यानंतर तुमचे आतील विश्‍व विसरून नव्या जोमाने सकारात्मक आयुष्य जगा.’ 

विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विजय आरोटे, कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेश गवळी, शिक्षक ज्ञानेश्‍वर मदने, अर्चना देशमुख,  शैलजा पांडकर, ज्योती जाधव, अश्‍विनी चौधरी आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कारागृहातील 180 बंदीवानांना राख्या बांधण्यात आल्या. पूनम गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिवानंद भांगरे यांनी आभार मानले.