Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Ahamadnagar › औचित्य वाढदिवसाचे, वेध विधानसभेचे!

औचित्य वाढदिवसाचे, वेध विधानसभेचे!

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 20 2018 11:15PMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे

विधानसभा निवडणुकीला जवळपास अजून दीड वर्ष वेळ आहे असे असताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी नागवडे कुटुंबीयही विधानसभा निवडणुकीला सक्षम असल्याचे सांगत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा यावरही भाष्य केले. त्यामुळे एकूणच नागवडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वक्तव्याने राजकीय पटलावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

तालुक्याच्या राजकारणात नागवडे, जगताप, पाचपुते आणि शेलार हे सक्रिय राजकारणी. आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुक नेते पायाला भिंगरी बांधून तालूका पिंजून काढताहेत. 14 मे रोजी राजेंद्र नागवडे यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीगोंदा येथे कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्या दरम्यान राजेंद्र नागवडे यांनी आपले मनमोकळे केले. तालुक्याच्या राजकारणात नागवडे कुटुंब हे निष्ठावान कुटुंब म्हणून ओळखले जाते. 

मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही आ. राहुल जगताप यांना विधानसभेत पाठविण्यासाठी निष्ठा ठेवून काम केले. नागवडे कुटुंबाचे तालुक्यात स्थान आहे, हे लक्षात घेऊनच आम्हीही विधनासभा निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाऊ. पण हे सांगतानाच देशाचे नेते खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्या आदेशाचे पालन नक्की केले जाईल. नागवडे आणि जगताप कुटुंब हे एकच असून आमच्यात कुणी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही असे ठणकावून सांगत सुरू असलेल्या वेगळ्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

याच कार्यक्रमात आ. राहुल जगताप यांनीही राजकीय मर्म ओळखत आणि सभेचा नूर लक्षात घेऊन सावध भूमिका घेतली.राजकारणात राजेंद्र नागवड़े आणि आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो आहोत. उद्या कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही एकच असणार आहोत.एकूणच विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवकाश आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहणार आहे. राजकीय बदल घडणार आहेत. आताच काय होईल हे सांगता येत नसले तरी राजकीय भाष्य हे होतच राहणार आहे. या भाष्याची राजकीय पटलावर, सोशल मीडियावर चांगलीच चर्चा घडते.

तात्यांच्या आठवणीने सगळेच भावूक

कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचाही 14 मे जयंतीदिवस. कुकडी कार्यस्थळावर रक्तदान शिबिर आणि रक्त शर्करा तपासणी  शिबिर आयोजित केले होते . जयंतीनिमित्त त्यांचे सहकारी, कार्यकर्ते कार्यस्थळावर जमले होते.  या निमित्ताने तात्यांच्या सहवासातील आठवणीना अनेकांनी उजाळा दिला. या आठवणींना उजाळा देत असताना सगळेच भावूक झाले होते. 

कुकडीच्या पाण्याने दिलासा 

तालुक्याच्या पूर्व भागात मागच्या वेळी पाणी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता मात्र शेतकरी वर्गाने एकी दाखवत आता सोडलेल्या आवर्तनामध्ये सुरुवातीला पाणी मिळावे ही मागणी मंजूर करून घेत जलसंपदा विभागाला त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी आवर्तनादरम्यान बैठक घेऊन पाण्याच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप थांबला तर आम्ही सगळ्याला पाणी देऊ शकू अशी भूमिका मांडली होती. त्यावर सगळ्याच नेत्यांनी सहमती दर्शवली होती. गेल्या सहा दिवसांपासून तालुक्याच्या पूर्वभागातील वितरिकांना पाणी सुरू आहे.कुठलाच राजकीय हस्तक्षेप झाला नसल्याने आवर्तन सुरळीत सुरू आहे. आता समाधानकारक पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनामध्ये राजकीय मंडळीनी हस्तक्षेप केला नाही तर पाणी मिळते ही शेतकरी वर्गाची धारणा झाली आहे.