Fri, May 24, 2019 03:27होमपेज › Ahamadnagar › राहुल पाटीलला ‘एलसीबी’ने दिले नातेवाईकांच्या ताब्यात

‘तो’ ९ वर्षांनी सापडला राजस्थानला!

Published On: Jul 08 2018 1:42AM | Last Updated: Jul 07 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

तब्बल 9 वर्षांपासून घरातून गायब झालेला राहुल प्रभाकर पाटील (रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता, नगर) हा राजस्थानमध्ये सापडला. तेथे तो एका मालमोटारीवर चालक म्हणून काम करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला नगरला आणून काल (दि. 7) नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. 

याबाबत माहिती अशी की, 14 ऑक्टोबर 2009 रोजी राहुल पाटील हा घरातून निघून गेला होता. त्यावेळी तो 20 वर्षांचा होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याचे चुलतभाऊ लक्ष्मण प्रल्हाद पाटील यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यावरून ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली होती. घरातून बेपत्ता झालेला राहुल हा राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील कपासन तालुक्यातील शनीमहाराज येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी राजस्थानला गेले.

पोलिसांना माहिती मिळाल्याप्रमाणे शनीमहाराज येथे राहुल पाटील सापडला. तेथे राहुल हा मालमोटारीचा चालक म्हणून काम करीत होता. घरातून निघाल्यानंतर त्याने काही दिवस मुंबई येथे मालमोटारीवर क्‍लिनर म्हणून काम केले. त्यावेळी त्याची एका चालकासोबत ओळख झाली. त्या ओळखीवरून तो चित्तोडगड येथे गेला. तेथे तोही चालक म्हणून काम करू लागला. मागील चार महिन्यांपासून तो चित्तोडगड जिल्ह्यातील शनीमहाराज येथे चालक म्हणून काम करीत होता. 

त्याला शनिवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक रंजन शर्मा यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिस प्रशासनाचे आभार मानले. पोलिस निरीक्षक पवार यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार नानेवर, दिनेश मोरे, दीपक शिंदे, रवींद्र कर्डिले, रोहीत मिसाळ आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.