होमपेज › Ahamadnagar › राजळे-ढाकणे गटांतील संघर्ष पेटण्याची चिन्हे

राजळे-ढाकणे गटांतील संघर्ष पेटण्याची चिन्हे

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:27PMपाथर्डी : सुभाष केकाण

बाजार समिती कारभाराच्या विरोधात आ. मोनिका राजळे समर्थकांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात केलेला बैठा सत्यागृह व त्यानंतर अ‍ॅड. ढाकणे यांनी पत्रकार परिषद घऊन कुरापती बंद करा, नाही तर सगळ्या भानगडी बाहेर काढील असा इशारा देत खरेदी-विक्री संघाच्या विरोधात आंदोलन करण्याचे जाहीर केल्याने राजळे, ढाकणे यांच्या गटातील कार्यकर्त्यांत संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 

गेल्या चाळीस वर्षांपासून राजळे व ढाकणे हे दोन कुटुंब राजकीयदृष्टया एकमेकांचे विरोधक आहेत. एकेकाळी माजी मंत्री बबनराव ढाकणे व माजी आ. आप्पासाहेब राजळे या दोन नेत्यांत तर वीस वर्षांपासून अ‍ॅड.प्रताप ढाकणे व राजीव राजळे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू होता. राजीव राजळे यांच्या निधनानंतर राजकीय धुरा आ. मोनिका राजळे यांच्या खांद्यावर आहे. त्या ढाकणे -राजळे या पूर्वापार सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला कशा हाताळणार, संघर्ष अधिक तीव्र करणार की समन्वयाची भूमिका घेवून शमवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

बाजार समितीच्या कारभाराबाबत या आठवड्यात बाजार समितीचे संचालक कुंडलिक आव्हाड, सुनिल ओहळ, अनिल बोरुडे, विजयकुमार लुणावत यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात बैठा सत्यागृह केला होता. या सत्यागृहाला माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके या प्रमुख पदाधिकार्‍यासह अनेकांनी पाठिंबा दिला होता. बाजार समितीच्या विरोधात झालेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांसह अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेवून वृद्धेश्वर कारखाना, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती, नगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत कुरापती थांबवा, नाही तर सगळ्या भानगडी बाहेर काढील. खरेदी-विक्री संघाची चौकशी आमदारकीचा दबाव वापरुन थांबवली आहे.त्यासाठी लवकरच आंदोलन केले जाईल, आमच्या नादाला लागू नका, नाद खुळा करील अशा शब्दांत अ‍ॅड. ढाकणे यांनी आव्हान देत आगामी राजकीय संघर्षाची ठिणगी टाकली आहे. अ‍ॅड. ढाकणे व स्व. राजळे हे एकमेकांच्या टीकेला खुबीने उत्तर देत होते. आ. राजळे या ढाकणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्याला कशा उत्तर देणार, त्यांची राजकीय संघर्षाची दिशा कशी असणार हे आगामी काळात ठरणार आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राजळे-ढाकणे असा राजकीय संघर्ष तीव्र होणार आहे. खरे पहाता बाजार समितीच्या आंदोलनावरुन पत्रकार परिषदेत राजळे यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या पदाधिकार्‍यांसह राजळे समर्थकांना जिव्हारी लागली आहे. वृद्धेश्वर कारखाना, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती, नगरपालिका या संस्थांना लक्ष्य केल्याने दोन गटांतील संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत.