Sat, Apr 20, 2019 16:14होमपेज › Ahamadnagar › ठाकरे आले अन् हात उंचावून निघून गेले

ठाकरे आले अन् हात उंचावून निघून गेले

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:14PMसंगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर व  घारगाव परिसरातील  मनसे कार्यकर्ते सकाळपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची वाट पाहत होते. मात्र, ते तब्बल चार तास उशिराने  आले. ते फक्त गाडीच्या खाली उतरून कार्यकर्त्यांना नुसता  हात करून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचा केलेल्या तयारीवर  पाणी फिरले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख  राज ठाकरे यांचे नाशिकवरून  सिन्नरमार्गे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घुलेवाडी शिवारात आले. मनसे कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. मात्र, त्यांनी तेथे कार्यकर्त्यांच्या आग्रहात्सव काही सेकंद  थांबत कार्यकर्त्यांना गाडीतून खाली उतरत  फक्त हात उंचावून  पुढे मार्गस्थ झाले.

तालुक्याच्या, पठारभागातील घारगावच्या मनसे जिल्हा प्रमुख किशोर डोके यांच्या  हॉटेल बिकानेर येथे काही काळ  थांबणार असल्यामुळे सकाळी अकरा वाजेपासूनच पठार भागातील शेकडो मनसेसैनिक त्यांची चातकाप्रमाणे  वाट पाहत होते. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सत्कारासाठी  साहित्य सुद्धा आणून ठेवले होते. मात्र त्यांचे तब्बल चार तास उशिराने खंदरमाळ शिवारातील हॉटेल बिकनेरवर आगमन झाले. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून कार्यकर्त्यांना हात जोडून  नमस्कार केला.थांबण्यास नकार देत चार मिनिटांतच  ते आळेफाट्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. बोटा येथील महामार्गालगत ही  हॉटेल साईजवळ कार्यकर्ते त्यांची वाट पाहात होते.सत्काराचा स्वीकार करून ते निघून गेले.