Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Ahamadnagar › नवापुरात पावसाचा कहर; तिघांचा मृत्यू, सहा बेपत्ता

नवापुरात पावसाचा कहर; तिघांचा मृत्यू, सहा बेपत्ता

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:21PMनंदुरबार : एकाच रात्रीतून झालेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. नवापूर तालुक्यात शुक्रवारी पहाटे जवळपास 140 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली.

या मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांना पूर आला होता. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तू आणि गाड्या वाहून गेल्या. तर, धुळे-सुरत महामार्गावरील पूल तुटल्याने वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. विसरवाडी परिसरात वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला  आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाशा गावित या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती झाडाला लटकल्याने ते मात्र थोडक्यात बचावले. तर खोकसा येथे पुराच्या पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला.

चिंचपाडा येथे देखील एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. या तिंघाच्या मृत्यूसह नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण बेपत्ता आहेत. पुराच्या पाण्यामुळे नवापूर तालुक्याचा रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला.पशुधनाच्या मृत्यूचीही मोठे आकडेवारी समजत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेकांची सुटका केली असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. तत्काळ नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिना कलशेट्टी यांनी दिले आहेत.