Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Ahamadnagar › ९० दिवसांत केवळ दोनच दिवस पाऊस

९० दिवसांत केवळ दोनच दिवस पाऊस

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:16PMकोपरगाव : प्रतिनिधी

चालू पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच 90 दिवसांत फक्त 21 जून आणि 16 ऑगस्ट असा दोनच दिवस पाऊस झाल्याने खरीप पिकांची वाट लागली आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्या करूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागलेले नाही. तेव्हा कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता सर्वच स्तरातून होऊ लागली आहे.  

कोपरगाव तालुक्यात चालू पावसाळी हंगामात चांगला पाऊस होईल, अशी असंख्य शेतकर्‍यांना आशा होती. त्या भरवशावर सोयाबीन, मका, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. महागडे बी-बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी करून लागवड केली. पण संपूर्ण 90 दिवसांत अवघा दोनच दिवस पाऊस झाल्याने या शेतकर्‍यांच्या खरीप पिकाची अक्षरक्ष: वाट लागली आहे.  काही शेतकर्‍यांनी विहिरीच्या, तसेच गोदावरी कालव्याच्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. पण उशीर झाल्याने ती जगू शकली नाही.  खरीप पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या तर बर्‍याच क्षेत्रावर पिकाची उगवण होण्याऐवजी बियाणे जळून गेले आहे. 

सन 2012 पासून हक्काच्या बारमाही गोदावरी कालव्याच्या पाटपाण्याची वाट लागली आहे. त्यात निसर्गाचे दुष्टचक्र थांबायला तयार नाही.  पाऊस बेभरवशाचा झाला आहे. जी काही ऊस पीक होते. त्यावरही हुमणी कीडीचा मोठ्या प्रमाणांत प्रादुर्भाव झाला आहे. पावसाने तीन महिने ओढ दिल्याने ऊस पीक चारा म्हणून जनावरांना घालून त्यांचे पालन पोषण शेतकर्‍यांना करावे लागले आहे.  
त्यातच मागील हंगामात बोंडअळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले.  पीकविमा कंपन्याचे साह्य वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्याच्यापुढे आत्महत्येवाचून दुसरा कुठलाच मार्ग उरला नाही. 

तेव्हा सरकारने दुष्काळ जाहीर करून त्यासाठी असणांर्‍या सोयी सुविधा व नियमांची कोपरगाव तालुक्यात अंमलबजावणी करावी तरच शेतकरी काही प्रमाणांत तग धरू शकेल अन्यथा त्याच्यावर संकटाची मालिका अशीच सुरू राहील व शेतकरी आत्महत्या होतील.