Sun, Jul 21, 2019 15:07
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › गुहात कुंटणखान्यावर छापा

गुहात कुंटणखान्यावर छापा

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 10:58PMराहुरी : प्रतिनिधी  

राहुरी तालुक्यातील दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी अन्य अवैध धंद्यांविरोधातही जोरदार मोहीम उघडली आहे. गुहा शिवारातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून काहींची धरपकड केली. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली, तर तीनजण पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने अनेकांची धांदल उडाल्याचे समजते. नगर-मनमाड रस्त्यावरील गुहा गावच्या शिवारात संजय थोरात यांच्या शेती गट नं. 600/1 मधील हॉटेल साई अमृतच्या कंपार्टमेंटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय केला जात होता. याविषयी खबर मिळाल्यानंतर राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी या ठिकाणी सापळा लावला.

रात्री 11.40 वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली व तात्काळ छापा टाकून जागा मालक संजय प्रकाश थोरात (गुहा), तसेच राहुलकुमार सूर्यदेव सिंग (औरंगाबाद), संजू बंगाली (कोपरगाव), रम्मू पिंजारी (श्रीरामपूर), धनंजय बाळासाहेब गोरे (राहाता), आबासाहेब नामदेव वीरकर (राहुरी), रवींद्र भास्कर बनगैय्या (संगमनेर), प्रशांत नंदू गहिरे (वैजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून यापैकी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम व मोटारसायकल असा 48 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

राहुरी तालुक्यात काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने त्यातून गुन्हेगारी वाढत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. वाळूतस्करी, दारूअड्डे, मटका हे गुन्हेगारांचे उगमस्त्रोत बनले आहेत. या अवैध धंद्यातूनच मध्यंतरी राहुरीतील शांतता संपून चोर्‍या-मार्‍या वाढल्या होत्या. यातून अनेक मोठ्या घटनाही घडल्याने राहुरीतील गुन्हेगारी चिंतनाचा विषय बनली होती.  याप्रकरणी पोलिस निरीक्षक वाघ यांनी गंभीरतेने लक्ष घालत अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली आहे.

राहुरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच दुचाकी चोरट्यांंची मोठी टोळी गजाआड केली आहे. तसेच अन्य काही अवैध धंद्यांवर कारवाई करून मोहिमेला जोर दिला असतानाच कालची कुंटणखान्यावरील कारवाईने अवैध धंद्येचालकांचे धाबे दणाणले आहेत. राहुरी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील धडक कारवाईत सातत्यत ठेवत राहुरी शहरासह राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परिसरातील मटका पेढ्या, दारूअड्डे यावरही कारवाई करावी, तसेच वाळूतस्करी रोखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.