होमपेज › Ahamadnagar › राहुरी येथील ज्येष्ठनेते रामदास धुमाळ कालवश

राहुरी येथील ज्येष्ठनेते रामदास धुमाळ कालवश

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 11:15PM

बुकमार्क करा

राहुरी : प्रतिनिधी

येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विकास मंडळाचे सर्वेसर्वा रामदास विश्‍वनाथ धुमाळ (वय 81) यांचे काल  पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे़  

रामदास (नाना) धुमाळ यांचा जन्म 1938 मध्ये झाला़ त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण विद्या मंदिर प्रशालेत झाले. टाकळीमियाँ व मुसळवाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटी स्थापन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. पुढे 1969 मध्ये जागृती व नंतर विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्थापितांना शह देताना तालुक्यात राजकीय दबदबा निर्माण केला होता.

मुळा-प्रवरा वीज संस्थेचे अध्यक्ष, राहुरी पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा समाजवादी काँग्रेसचे खजिनदार, जिल्हा बँकेचे संचालक, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आदी ठिकाणी त्यांनी काम  पाहिले. 

तसेच अखिल भारतीय ऊस उत्पादक परिषदेचे आयोजन व शेतकरी आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला होता. त्यांच्या कार्यामुळे दिल्ली येथे राजीव गांधी जयंतीनिमित्त ‘शिरोमणी पुरस्कार’ तसेच मुंबई येथे नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ निअल व्हॅलनर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर धुमाळ यांचे ते वडील होत.