Fri, Apr 26, 2019 17:32होमपेज › Ahamadnagar › ऊस दरावरून शेतकर्‍यांत नाराजीचा सूर

ऊस दरावरून शेतकर्‍यांत नाराजीचा सूर

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:15PMराहुरी : प्रतिनिधी

साखर दर घसरत असल्याने कारखान्यांनी ऊस उत्पादकांना दिलेला दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. दरम्यान, प्रारंभी ऊस दरासाठी रस्त्यावर उतरणारे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कमी होत जाणार्‍या साखर दराबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. राज्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी ऊस उत्पादकांना 3200 रूपये दर मिळावा म्हणून शेतकरी संघटनांनी सर्वत्र हल्लाबोल करून कारखान्यांची चांगलीच कोंडी केली होती. दरम्यान, दराबाबत सर्वाधिक धग नगर जिल्ह्यात पेटल्यानंतर शेवगाव भागात गोळीबाराची घटना घडली.

राहुरीत शेतकरी संघटनेने कारखान्यांचे काटा बंद करून उसाची वाहने अडविली होती. ेन शेवटच्या टप्प्यात आंदोलक व कारखानदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. 3200 रूपये दर मागत असताना साखर दराच्या हिशोबाने सर्वच कारखान्यांनी 2300 रूपयांचा एफआरपी अदा करण्याचा निर्णय घेतला. यावर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सहमती दर्शवत 2300 रूपये एफआरपी देण्याच्या निर्णयास शिक्कामोर्तब झाला.  प्रारंभी बाजारात 3800 रूपयापर्यंत वाढलेले साखर दर 2800 ते 2850 रूपयांपर्यंत घसरल्याने कारखानदारांनीही शेतकर्‍यांना कमी दर देण्याचा निर्णय घेतल्याचे समजले आहे.

प्रारंभी 2300 रुपये प्रतिटन दर देणार्‍या कारखान्यांकडून 2 हजार 2100 रूपये दर दिला जात असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये होत आहे. राहुरीत काही कारखान्यांनी तर ऊस तोडणीपूर्वी शेतकर्‍यांकडून फॉर्म भरून घेण्यास प्रारंभ केला असून यामध्ये 2 हजार रुपये दर देण्यास संमती असल्याचे लिहून घेतले जात आहे. त्यामुळे राहुरी भागात ऊस उत्पादक शेतकर्‍यांची लूट सुरू झाली असून शेतकर्‍यांना ऊस तोडणीसाठी वेठीस धरले जात असल्याचे दिसून येत आहे. 

ऊस दरासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने हाती घेणार्‍या संघटना मात्र साखर दर घसरल्याने कारखानदारांनी एफआरपी कमी करीत असल्याच्या निर्णयाबाबत चकार शब्दही काढत नसल्याने ऊस उत्पादकांची बोळवण होत असल्याचे दिसत आहे.  सर्वच क्षेत्रातून दुर्लक्षित होत चाललेला ऊस उत्पादक शेतकरी मात्र काहीही करा मात्र, माझे शेत मोकळे करा म्हणत कारखानदारांकडे रांग लावून उभा आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यात साधारण 14 ते 15 कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या. राहुरीत साधारण 12 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची तोडणी सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी राहुरीतून ऊस तोडणी सुरू केली. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने अपेक्षित ऊस त्यांना कमी अवधीतच प्राप्त झाला.  अनेक कारखान्यांनी आपल्या टोळ्या राहुरीतून काढून घेतल्या आहेत.