Tue, Apr 23, 2019 00:19होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात तीन युवकांना अटक

नगर जिल्ह्यात तीन युवकांना अटक

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 11:00PM

बुकमार्क करा
शिक्रापूर/शिरूर : वार्ताहर

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या जातीय दंगलीत सणसवाडी येथे जमावाने ठार मारलेल्या राहुल फटांगडे या युवकाचा खून व दंगा भडकवल्याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींना अतिशय कडेकोट बंदोबस्तात शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयात गर्दी केली होती. हे युवक नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पाररगाव सुद्रिक येथील आहेत.

याचबरोबर दंगल भडकवणे, जाळपोळ करणे या आरोपांखाली सणसवाडी येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. राहुल फटांगडेच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी तर उर्वरित पाच आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीचे  पडसाद सणसवाडी येथेही उमटले. त्यावेळी राहुल फटांगडे या युवकाचा जमावाने खून केला. दंगलीत बळी गेल्यामुळे तपास करण्याचे मोठे आव्हान  तसेच दबाव पोलिसांवर होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्लीप, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल डम डाटा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक डाटा तपासला. याआधारे पोलिस तीन खुन्यांपर्यंत पोहचू शकले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. राहुल फटांगडेच्या खुनातील तीन आरोपी पोलिसांना मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात एकूण एकावन्न आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये देहूरोड  पोलिसांनी बुधवारी सोळा आरोपींना अटक केली होती.