Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Ahamadnagar › ना तपास..ना मदत..!

ना तपास..ना मदत..!

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

माळीवाडा येथील कुरियर येथे रेडिओत क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन सव्वादोन महिने उलटले आहेत. अजूनही दहशतवाद विरोधी पथक (सीआयडी) या स्फोटाचा तपास लावू शकले नाही. तसेच जखमी झालेल्यांनाही सरकारकडून कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळू शकली नाही. 

स्फोट झालेल्या रेडिओचे पार्सल पुण्यातील सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या पत्त्यावर पाठविण्यासाठी कुरियर दुकानात दिले होते. तेथील कर्मचार्‍याने सदर पार्सल फोडून पाहिल्याने कुरियर दुकानातच 20 मार्च रोजी रात्री 10 वाजता स्फोट होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. यामागे काश्मिरी खोर्‍यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या नहार यांच्या घातपाताचा कट होता. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. म्हणून गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’कडे सोपविण्यात आला. ‘एटीएस’च्या पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी दीड महिना नगरमध्ये तळ ठोकून होते. तरीही स्फोट घडवून आणणार्‍यांबद्दल कसलाही ‘क्ल्यू’ तपास यंत्रणेला मिळू शकला नाही. अतिशय नियोजनबद्धरित्या हा गुन्हा करण्यात आलेला आहे. स्फोटात वापरलेला रेडिओ राज्यातील फक्त नगर व आणखी एका शहरातच मिळतो. नगरमध्येही फक्त पाचच दुकानांत मिळतो, असे चौकशीतून पुढे आले होते. गुन्ह्याची पद्धत पाहता बॉम्ब तयार करून पार्सल दुकानात आणून देणार्‍यास नगरची चांगली माहिती होती, हे दिसून येते. 

काहीच हाती लागत नसल्याने नगरलाच तळ ठोकून असलेले ‘एटीएस’चे वरिष्ठ अधिकारी पुणे व औरंगाबाद येथून तपास करीत आहेत. एक पथक नगरवरच लक्ष ठेवून आहे. मात्र, अजूनही तपास यंत्रणेच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागू शकली नाही. स्फोटात वापरलेला रेडिओ नगरमधूच खरेदी केला, पण कोणी खरेदी केला, हे निष्पन्न होऊ शकले नाही. एकीकडे गुन्ह्याचा काहीच तपास लागलेला नसताना, दुसरीकडे सरकारने जखमींना कसल्याही प्रकारची आर्थिक स्वरुपात मदत केली नाही. शासनाचा प्रतिनिधी म्हणून एकही मंत्री जखमींची विचारपूस करण्यासाठीही फिरकला नाही. यातून सरकारचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. एखादा किरकोळ अपघात झाल्यानंतरीही जखमींना मदत करण्यासाठी पुढे सरसावणारी सरकारी यंत्रणा बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी का पुढे आली नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.