होमपेज › Ahamadnagar › जात विचारून आंदोलनासाठी बंदोबस्त : राधाकृष्ण विखे

जात विचारून आंदोलनासाठी बंदोबस्त : राधाकृष्ण विखे

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 12:02AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलिस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

नागपूर आधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते ना.विखे  यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतरही त्यांनी दिल्‍ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीस हजेरी लावली. लोणी येथे परतल्यानंतर वैद्यकीय तपासण्या त्यांनी केल्या. यामध्ये डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्‍ला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवरही राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात ना.विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारवर घणाघात केला. 

ना. विखे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील 60 वर्षांत घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने 4 वर्षात करून दाखवले आहे. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकार्‍यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकार्‍यांमध्ये भेदभाव करणार्‍या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विख यांनी यावेळी केली.

मागील 8 दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना आजच्या क्षणापर्यंत सरकार चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांपर्यंत का पोहोचले नाही? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. कदाचित मराठा समाज 2-4 दिवस आंदोलन करून शांत बसेल, असे सरकारने गृहित धरलेले दिसते. मूक मोर्चानंतर सरकारने मराठा समाजाला केवळ गृहित धरून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली. पण मराठा समाजाला गृहित धरण्याची चूक सरकारने पुन्हा करू नये. सरकारने तातडीने आंदोलनकर्त्या मराठा संघटनांची बैठक बोलवावी आणि मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा हे आंदोलनकर्ते उद्या अख्खा महाराष्ट्र ठप्प पाडतील, हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो,   शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर  त्यांनी सरकारबाहेर पडावे, असे आव्हान ना. विखे यांनी दिले आहे.