Tue, Apr 23, 2019 14:02होमपेज › Ahamadnagar › मेडिकल प्रवेशात गंडा घालणारे रॅकेट

मेडिकल प्रवेशात गंडा घालणारे रॅकेट

Published On: Jun 01 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 11:46PMनगर : प्रतिनिधी

विळद घाटातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणार्‍या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. यात पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले. प्रवेशाच्या नावाखाली गंडा घालणारे हे आंतरराज्य रॅकेट पकडल्याने विविध गुन्ह्यांची उकल होणार आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये अमित राजेंद्रप्रसाद सिंग (रा. पणजी, गोवा), राहुल सुवेंद्रकुमार शर्मा (रा. सहारनपूर, उत्तरप्रदेश), राहुलकुमार विद्यासागर दुबे (रा. फरिदाबाद, दिल्ली), संदीप दीनानाथ गुप्ता (रा. मीरा रोड, मुंबई) व कौशिक श्रीरामगुजर तिवारी (रा. एमआयटी, फरिदाबाद) यांचा समावेश आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस हवालदार भास्कर बडे, पोलिस नाईक प्रवीण खंडागळे, पोलिस नाईक महेश दाताळ, पोलिस शिपाई योगेश कवाष्ठे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर येथील अजिंक्य गोविंद बिरादार हे त्यांच्या बहिणीच्या व तिच्या मित्राच्या पदव्युत्तर डॉक्टरीच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत होते. त्यांना दि. 22 मे रोजी एका व्यक्तीचा फोन आला. ‘प्रत्येकी वीस लाख रुपये दिल्यास अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो’, अशी बतावणी आरोपीने फोनवरून केली.

त्यानंतर आरोपींनी वरील दोन्ही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचे भासवून त्यांच्याकडून  दि. 26 मे व 31 मे  रोजी 4 लाखांचा डीडी व 6 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेतली. काल (दि. 31) दुसरा प्रवेश घेण्यासाठी बिरादार  आले असता त्यांना याबाबत संशय आला. बिरादार यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे संपर्क साधून मदत मागितली.

प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थी व पालक यांना बळजबरीने लुटून गोवा पासिंग असलेल्या कारमधून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. आरोपींकडून विखे फाउंडेशनचे बनावट शिक्के, ओळखपत्रे, लेटर पॅड असे विविध प्रकारचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी आंतरराज्यीय असून हे आरोपी अनेकांना गंडा घालत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. आरोपींविरुद्ध भादंवि कलम 395, 420, 471, 472, 473, 468, 464, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.