Tue, Jun 25, 2019 13:21होमपेज › Ahamadnagar › पुरोगामित्वाला कान्हूरच्या घटनेने धक्‍का 

पुरोगामित्वाला कान्हूरच्या घटनेने धक्‍का 

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 10:46PMपारनेर : प्रतिनिधी

पुरोगामी ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा धक्‍का अनुभवला. तोही स्वातंत्र्यापूर्वीपासून कम्युनिष्ट विचारसरणीस पाठबळ देणार्‍या गावात. जेथे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ रुजली, रुचली आणि बहरलीही त्याच भूमीत! तब्बल तीस वर्षांपेक्षाही जास्त काळापासून सुरू असलेल्या या उद्योगाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला असला, तरी या रॅकेटची पाळेमुळे खोदून सत्य बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनापुढे आहे. 

पारनेर तालुक्याने आपल्या पुरोगामी वारशाची वेळावेळी साक्ष दिली आहे. कान्हूरपठार सारख्या घटनांमुळे तालुक्याच्या लौकिकास धक्‍का बसला असला, तरी अनेकविध बाबींमध्ये तालुक्यातील जनतेने बजावलेल्या भूमिकेची समाजधुरिणांनी दखल घेलेली आहे. अर्थात अंधश्रद्धेच्या अशा घटनांमुळे ऐरणीवर येतो तो तालुक्याच्या पुरोगामी वारशाचा प्रश्‍न, त्यावर लागलीच चर्चा सुरू होते. यापुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी पुरोगामी विचारांची पाठराखरण करणार्‍या, अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार जोपासणार्‍या कार्यकर्त्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. तब्बल तीस वर्षे हा उद्योग सुरू असलेल्या कान्हूरपठारमध्ये या उद्योगाविरोधात आवाज का उठविला गेला नाही, अथवा सबंधितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही कान्हूरकरांनी चुप्पी राखणे का पसंत केले, याचाही शोध व बोध घेणे क्रमप्राप्त आहे.

गुन्हे दाखल झाल्यानंतर सबंधितांचे नातेवाईक जसे काही झालेच नाही, अशा अविर्भावात वावरत असून भरपूर पैसा कमवलाय, तो खर्च करून त्यातून सहीसलामत बाहेर येऊ, यशी दर्पोक्‍तीही केली जातेय. तालुक्याच्या परंपरेसाठी ही बाब खचितच योग्य नाही. या प्रवृत्तींना पाठिशी न घालता त्यांचे खरे रूप जनतेसमोर आले तर असे उद्योग करण्याचे धाडस कोणी करणार नाही. 

बबन ठुबे व माधव सोनावळे या दोघा भोंदूंच्या टोळीचा भांडाफोड झाल्यानंतर अशाच पद्धतीने तब्बल तीस वर्षांपूर्वी तालुक्यात घडलेल्या दोन घटनांच्या स्मृती नागरिकांमध्ये जाग्या झाल्या. 1988 साली तालुक्यातील मांडओहळ धरणाजवळील रूईचोंढा धबधबा परिसरात घडलेले उषा रेपाळे खून प्रकरण असेच अंधश्रद्धेतून घडले होते. त्या पाठोपाठ जामगाव येथील बढे बाबा या भोंदूचा पर्दाफाश पारनेर व कान्हूरपठार येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. उषा रेपाळे खून प्रकरण व भोंदू बढे बाबाचे प्रकरण त्यावेळी संपूर्ण राज्यात गाजले होते. 

बढे बाबाचा मठ न्यायालयीन आदेशानुसार उद्ध्वस्त करण्याची दुर्मिळ घटना राज्यात प्रथमच घडली. उषा रेपाळे व तिचे कुटूंब मूळचे तालुक्यातील पुणेवाडी येथील. परंतु व्यवसायानिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले होते. उषा रेपाळे हिच्या अंगात सात असरा देवी असल्याची अंधश्रद्धा त्यांच्या कुटूंबात होती. याच अंधश्रद्धेतून उषा रेपाळे व तिचे कुटूंब मांडओहळ धरणाजवळ असलेल्या रूईचोंढा धबधबा परिसरात असलेल्या सात असरा देवीच्या दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी उषाच्या अंगात सात आसरा देवीचा संचार होऊन तिने धबधब्यामुळे तयार झालेल्या डोहात उडी घेतली. उषाच्या अंगात देवीचा संचार झाला असून सात दिवसांनी ती डोहाबाहेर सुखरूप येईल, असा प्रचार तिचा पती सुखदेव व तिच्या कुटुंबियांनी केला. त्यावेळी संपर्काची कोणतीही आधुनिक साधने नसतानाही पाण्यात पडलेली महिला देवीच्या रूपात सात दिवसांनी बाहेर येणार असल्याचे वृत्त नगर, पुणे जिल्ह्यात वार्‍यासारखे पसरले. त्यामुळे उषा रेपाळेच्या दर्शनासाठी दोन्ही जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी रूईचोंढा धबधब्याजवळ रिघ लावली. 

हा प्रकार अंधश्रद्धेतून घडला असल्याची पारनेर व कान्हूरपठार येथील अंनिसच्या कार्यकर्त्यांची खात्री होती. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून उषा रेपाळे प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र महसूल व पोलिस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार कानावर घातला. दाभोळकरांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अंधश्रद्धेतून घडत असलेल्या या प्रकारास महसूल व पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप केला. राज्यातील आघाडीच्या इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांमध्ये अंधश्रद्धेच्या प्रकाराबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व मोठ्या बंदोबस्तात उषा रेपाळे हिचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी डोहातून बाहेर काढण्यात आला.

जामगाव येथील बढे बाबाने मंत्रतंत्राच्या मदतीने मूल होते, असाध्य रोग बरे करतो, मुक्या व्यक्‍तीला बोलायला लावतो, अपंगाला चालायला लावतो, असा दावा करीत अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता. प्रत्येक अमावस्येला व पौर्णिमेला जामगावसारख्या खेड्यात हजारोंच्या संख्येने भाविक जमत. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या भोंदूस आव्हान दिले व तो करीत असलेले दावे सिद्ध करावेत अन्यथा हे उद्योग बंद करावेत असा इशारा दिला.

बाबाने आव्हानही स्वीकारले. मात्र तो एकही दावा सिद्ध करू शकला नाही. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून बाबाचा मठ अनधिकृत असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. उपविभागिय अधिकार्‍यांनी मठ अनधिकृत असल्याचा निर्वाळा देत तो जमिनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर बाबाने या आदेशास न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने उपविभागीय अधिकार्‍यांच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केल्यानंतर पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सन 1992 मध्ये रात्रीतून हा मठ उद्ध्वस्त करण्यात आला. अंनिसने त्यावेळी या प्रकारास प्रतिबंध केला नसता, तर बढे बाबाचे आज मोठे प्रस्थ असते. कदाचित आसाराम, राम रहिमच्या पंक्‍तीमध्येही तो बसला असता! दोन्ही घटनांचा भांडाफोड करण्यासाठी अंनिसचे संजय वाघमारे, विजयानंद साळवे, शाहीर गायकवाड, रायचंद ठुबे, कैलास लोंढे, देवदत्‍त साळवे, सुभाष ठुबे यांच्यासह तत्कालीन तहसीलदार प्रल्हाद कचरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कै. राजेंद्र तांबे यांनी मोलाची भूमिका बजावली होती.