Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Ahamadnagar › कुकडीच्या पाण्यावर पुणेकरांचेच वर्चस्व

कुकडीच्या पाण्यावर पुणेकरांचेच वर्चस्व

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी 

राज्यात सत्ता बदल होऊनही कुकडीच्या पाण्यावर पुणेकरांचे असलेले वर्चस्व कमी होण्यास तयार नाही. त्याचा अनुभव कर्जत व श्रीगोंदेकर सध्या घेत आहेत. आजही आवर्तन सुटले तरी शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मात्र मिळत नाही. अनेक चार्‍या व पोटचार्‍यांना पाणी सुटले की बंद करण्यात येते. त्यामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुणेकरांचे हे वर्चस्व कधी संपणार व पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यांना हक्काचे पाणी कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. 

पावसाळ्यात चांगला पाऊस पडला. कुकडी लाभ क्षेत्रातील सर्व धरणे भरली. त्यामुळे यावेळी तरी किमान चार आवर्तने मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी करीत होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत तीनच आवर्तन सुटली आहेत. त्यातील 29 जुलै रोजी सुटलेले आवर्तन हे पावसळ्यात जादा पाऊस झाला व नद्यांना पूर आला होता.

मोठ्या प्रमाणात धरणामध्ये पाणी येत असल्याने ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी पिकांसाठी आवर्तन सुटले होते. आता 25 फेब्रुवारी रोजी आवर्तन सुटले आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी आवर्तन सुटणार आहे. थोडक्यात काय तर धरण भरले तरी ओव्हरफ्लोसह नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना चारच आवर्तन मिळतात. त्यामुळे कालवा आठमाही असला, तरी तेवढे पाणी मिळत नाही, हे आता उघड झाले आहे. 

पाण्यावर पुणेकरांची दादागिरी सुरूच

25 फेब्रुवारी रोजी सुटलेले आवर्तन टेल टू हेड होते. हे पाणी 3 ते 4 मार्च रोजी कर्जत हद्दीत पोहचले पाहिजे. मात्र ते यावेळी खूपच उशिरा पोहचले. तसेच या पाण्याला पुसेरा दाबही नव्हता. आवर्तन टेल टू हेड असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. वरती सर्वत्र चार्‍यांचे गेट उघडण्यात आले होते. त्यामुळे पाणी खाली कमी दाबाने आले. त्यामुळे तालुक्यातील अनेक पोटचार्‍यांना यावेळीही पाणी मिळाले नाही.

राज्यात आघाडी सरकार होते, त्यावेळी पुणे जिल्ह्यातील काही आमदार कुकडीचे पाणी खाली येऊ देत नव्हते. धरणांसाठी आमच्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या. त्यामुळे आम्हालाच पाणी मिळाले पाहिजे, असे ते उघडपणे सांगत. मात्र आता राज्यात भाजपचे सरकार आहे. असे असतानाही परिस्थितीत काय बदल झाला, असा सवाल शेतकरी विचारीत आहेत. यापूर्वी बैठका झाल्याशिवाय आवर्तन सुटत नव्हते. आता बैठकांचा फार्स बंद झाला आहे, येवढाच काय तो फरक झाल्याचे दिसते.

पोटचार्‍यांचा व अस्तरीकरणाचा प्रश्‍न कायम

कर्जत तालुक्यासाठी कुकडी योजनेतून 29 हजार हेक्टर पाणी कोटा आहे.  मात्र प्रत्यक्षात तालुक्यास तेवढे पाणी मिळत नाही. याचे कारण तालुक्यातील चार्‍यांचे हस्तांतर झालेले नाही. अनेक चार्‍यांची व पोटचार्‍यांची, गेटची कामे अपूर्ण आहेत. त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. राज्यात सत्तांतर होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत. पाटबंधारे खाते भाजपकडे असून अद्यापही हे काम झाले नाही. सरकार केवळ शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढले पाहिजे, अशा घोषणा करते. मात्र ही कामे केव्हा पूर्ण होतील व पुणेकरांची दादागिरी केव्हा संपेल, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. 

 

Tags : Karjat, Karjat news, Kukadi water, Pune,


  •