होमपेज › Ahamadnagar › मालमत्ता एक अन् रेशनकार्ड अनेक!

मालमत्ता एक अन् रेशनकार्ड अनेक!

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:37PMनगर : प्रतिनिधी

वारुळाचा मारुती व काटवन खंडोबा येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल वाटपात झालेल्या गोंधळानंतर एकाच मालमत्तेत राहणार्‍यांनी अनेक रेशन कार्ड तयार करुन घरकुले लाटल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकरणातूनच रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणार्‍या रामवाडी येथील एका कुटुंबाला घरकूल न मिळाल्याची व याच मालमत्तेचा पुरावा देऊन इतरांनी घरकूल लाटल्याची तक्रार महापालिका आयुक्‍तांकडे करण्यात आली आहे.

तारकपूर ते सर्जेपुरा रस्ता विकसित करण्यात येणार असल्याने या रस्त्यात बाधित होणार्‍या रामवाडी परिसरातील कुुटुंबांना मनपाकडून घरकुले देण्यात येणार आहेत. त्यासाठी शनिवारी (दि.21) महापालिकेत सोडतही काढण्यात आली. रामवाडी व इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील 133 लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र, मनपाकडे केवळ 123 घरकुलेच असल्यामुळे सोडत काढण्यात आली. यात ज्या 10 जणांना घरकुले मिळाली नाहीत, त्यांनी या घरकूल वाटपावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेत यावरुन गोंधळ झाल्यानंतर घरकूल मिळालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील काहींना दोन-दोन घरकुले मिळाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यातच रामवाडी येथील सिकंदर शेख यांनी आयुक्‍तांकडे याबाबत तक्रारही केली आहे. रस्ता रुंदीकरणात त्यांचे घर बाधित होत आहे. मात्र, त्यांना मनपाकडून घरकूलच मिळाले नाही. याउलट काहींनी त्यांच्या मालमत्तेचे पुरावे सादर करुन घरकूल लाटल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

रामवाडी येथे मनपाने केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात 24 घरे बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, मनपाने तेथील लाभार्थ्यांना घरकुले देण्याची कार्यवाही सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. एकाच कुटुंबियांनी विभक्‍त होऊन स्वतंत्र रेशनकार्ड तयार करुन घेतले आहे. मनपाकडे अर्ज करतांना स्वतंत्र रेशनकार्ड सादर झाल्यामुळे मनपावरही दोन स्वतंत्र कुटुंबांना लाभार्थ्यांच्या यादीत सामावून घेण्याची वेळ आली आहे. ‘मालमत्ता एक व रेशनकार्ड अनेक’ या खेळामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन काही लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे. स्वतंत्र रेशनकार्डामुळे निर्माण झालेल्या या प्रश्‍नासंदर्भात प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकार्‍यांकडे माहिती सादर केली जाणार असल्याचे प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान आवास योजनेत पुनर्वसन!

महापालिकेकडे 133 लाभार्थ्यांसाठी केवळ 123 घरकुले असल्याने त्यांची सोडत काढण्यात आली. यात 10 जणांना घरकुले मिळालेली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या घरकूल प्रकल्पात त्यांना प्राधान्य देवून महापालिका त्यांचे पुनर्वसन करेल, याबाबत निर्णय घेतला जाईल. विभक्‍त करण्यात आलेल्या रेशनकार्डमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.