Wed, May 22, 2019 21:23होमपेज › Ahamadnagar › पदोन्नत्या, बदल्या रखडल्या

पदोन्नत्या, बदल्या रखडल्या

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:18PMनगर : प्रतिनिधी

राज्य सेवा हमी कायद्यात मंत्रालयातील विविध विभागांच्या सेवा व आस्थापना तसेच सामान्य जनतेच्या इतर सेवांचा समावेश करा, अशी मागणी जिल्हाभरातील महसूल अधिकार्‍यांनी केली आहे. हा कायदा मंत्रालयातील विविध विभागांना लागू झाल्यास, शासकीय अधिकार्‍यांच्या पदोन्‍नत्या, बदल्या रखडल्या जाणार नाहीत.

महाराष्ट्र राज्यात राज्य सेवा हमी कायदा 1 ऑक्टोबर 2015 पासून लागू झाला आहे. या कायद्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा विहित कालावधीत पुरविणे राज्य प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना बंधनकारक आहे. विविध शासकीय सेवा या तालुका, जिल्हा व विभाग अशा विविध क्षेत्रीय पातळीवर निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत.सर्वच शासकीय कार्यालये ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत.तथापि राज्य सेवा हमी कायदा 2015 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या विविध शासकीय सेवांमध्ये राज्य शासनाच्या मंत्रालय पातळीवर कुठल्याही सेवेचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील सर्व शासकीय अधिकारी यांच्या पदोन्‍नत्या, बदल्या, पदस्थापना व सेवा ज्येष्ठता यादीचे काम रखडले जात असल्याचा आरोप महसूल अधिकार्‍यांनी केला आहे.

याबाबत या अधिकार्‍यांनी 12 फेब्रुवारी रोजी राज्य सेवा हमी विभागाचे मुख्य आयुक्‍त यांना निवेदन दिले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी संबंधित विविध प्रश्‍नांवर मंत्रालय पातळीवर कार्यवाही केली जाते. परंतु आस्थापना व सेवा विषयक प्रश्‍नांवर वेळेत कार्यवाही होत नाही. यामध्ये प्रदीर्घ असा विलंब होत आहे. परिणामी शासकीय अधिकारी व कर्मचारी हे पदोन्‍नती, बदल्या आणि सेवा ज्येष्ठता यादीपासूनच वंचित राहात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. या निवेदनावर अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री ए.बी. आनंदकर, रवींद्र ठाकरे, ज्योती कावरे, वामन कदम, तेजस चव्हाण आदींसह सर्व तहसीलदारांच्या सह्या आहेत.