Wed, Nov 13, 2019 12:18होमपेज › Ahamadnagar › प्रकल्पबाधिताची धरणात जलसमाधी

प्रकल्पबाधिताची धरणात जलसमाधी

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMभामा-आसखेड : वार्ताहर

न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासनाकडून जमीन देण्यास होत असलेली दिरंगाई आणि कर्जबाजारीपणामुळे भामा-आसखेड प्रकल्पबाधित शेतकर्‍याने धरणात जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी रौंधळवाडी (ता. खेड) येथे घडली. ज्ञानेश्‍वर शांताराम गुंजाळ (36)  असे त्यांचे नाव असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कर्जाचा डोंगर आणि त्यात शासनाकडून जमीन मिळेना म्हणून ज्ञानेश्‍वर यांनी जलसमाधी घेतल्याचे पत्नी प्रतिभा यांनी सांगितले. 

भामा- आसखेड प्रकल्पासाठी 30 वर्षापूर्वी ज्ञानेश्‍वर गुंजाळ यांची 11 एकर जमीन संपादित केली होती. त्यावेळी त्यांचे शांताराम गुंजाळ हे खातेदार होते. वडिलांच्या निधनानंतर ज्ञानेश्‍वर यांनी जमीन मिळावी म्हणून 388 प्रकल्पग्रस्तांबरोबर न्यायालयात दावा दाखल केला. सुनावणीनंतर प्रकल्पाबाधितांना जमीन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परंतु, प्रशासनाकडून जमिनी देण्याचे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने महिन्यापूर्वी प्रकल्पबाधितांनी पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत धरणावरून होणार्‍या पुणे महापालिकेच्या जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम सुरू करू नये. पोलिस बळाचा वापर करून काम सुरू केले, तर 23 गावांतील प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेतील, असा इशारा दिला होता. 

जमीन मिळत नाही आणि वाढत जाणारा कर्जाच्या बोजाने आलेल्या नैराश्यातून ज्ञानेश्‍वर यांनी धरणात जलसमाधी घेतली. गावात ही घटना समजताच किरण चोरघे, संजय शिनगारे, गणेश रोकडे, रमेश रौंधळ यांनी धरणात उतरुन ज्ञानेश्‍वरला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानंतर तळेगाव येथील एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता ज्ञानेश्‍वर याचा मृतदेह सापडला. 

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत अलसटवार, सतीश पाटील, चाकण ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह नायब तहसीलदार राजेंद्र जाधव आदींनी भेट दिली. पोलिसांचे पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

पात्र यादीत 4 एकर जमीन 

प्रकल्बाधितांनी केलेल्या आंदोलनानंतर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादीत ज्ञानेश्‍वर गुंजाळ याचेही नाव आले असून त्याला 4 एकर जमिन मिळणार होती. गरीब परिस्थितीमुळे त्याने कर्जही घेतले होते. अन्य पर्याय उरला नसल्याने जलसमाधीचा निर्णय घेतला. ज्ञानेश्‍वरच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. 

इशार्‍याचा पहिला बळी

जमीन परत मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात ज्ञानेश्‍वर हे कायम सक्रिय होते. मागणी मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेतील, असा इशारा दिला होता. परंतु, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. या इशार्‍याचा ज्ञानेश्‍वर हा पहिला बळी ठरला आहे. जमीन न मिळाल्यानेच ज्ञानेश्‍वरने जलसमाधी घेतली असल्याचे आंदोलनाचे प्रमुख चांगदेव शिवेकर, बन्सू होले, सत्यवान नवले, देविदास बांदल, किसन नवले, तुकाराम नवले, गणेश जाधव यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्तांनी या वेळी सांगितले.