Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Ahamadnagar › पुरोगामी चळवळींनी एकत्र यावे : कॉ. पाटणकर

पुरोगामी चळवळींनी एकत्र यावे : कॉ. पाटणकर

Published On: Feb 22 2018 1:30AM | Last Updated: Feb 22 2018 1:26AMनगर ः प्रतिनिधी

फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी अशा सर्व पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींनी साम्यस्थळे शोधून आपल्या चळवळी अधिक घट्ट केल्या पाहिजे. त्यानंतरच प्रतिगामी शक्तींना प्रभावीपणे शह देता येणार आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्‍तीदलाचे अध्यक्ष कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शाहिद दिनानिमित्त सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह येथे आयोजित अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. पाटणकर बोलत होते. रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर अध्यक्षस्थानी होते. जागतिक कीर्तीच्या समाजशास्रज्ञ गेल ऑम्व्हेट व भाकपच्या महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे आदी विचारपीठावर उपस्थित होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम.कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना शोधण्यासाठी आता पोलिस यंत्रणा व सरकार असमर्थ आहेत, अशी सद्यस्थिती आहे. अशा परिस्थितीत आता आपण स्वस्थ बसून चालणार नाही.

पुन्हा एकदा सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन गोव्याच्या सनातन आश्रमात जाऊन मारेकर्‍यांचा शोध घेतला पाहिजे. जात, वर्ग आणि शोषणापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी सध्याची राजकीय सत्ता संपवली पाहिजे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने करून चळवळी अधिक बळकट केल्या पाहिजेत. 

कष्टकरी जनतेची चळवळ चालविणारे  कॉ. गोविंद पानसरे ही व्यवस्थेविरुद्ध लढणारी एक समग्र चळवळ होती, म्हणून त्यांना संपविण्यात आले. अशा परिस्थितीत प्रबोधनाच्या चळवळीतील विविध विचार प्रवाहांनी एकत्र लढा दिला पाहिजे, तरच समाजाची अस्वस्थता संपेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

या अभिवादन सभेस कॉ. सुरेश संत, कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. कॉ. रमेश नागवडे, अ‍ॅड. रंजना गवांदे, कॉ. बहिरनाथ वाकळे, संध्या मेढे, नीलिमा बंडेलू,  विठ्ठल बुलबुले आदींसह पुरोगामी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. कॉ. बन्सी सातपुते यांनी आभार मानले.