Tue, May 21, 2019 12:30होमपेज › Ahamadnagar › प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक वार्‍यावर

प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक वार्‍यावर

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 08 2018 11:52PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कारांच्या कार्यक्रमामागे लागलेले शुक्लकाष्ठ काहीकेल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या वर्षी पुरस्कार वितरण कार्यक्रम न झाल्याने आता 10 सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ‘भारत बंद’चे निमित्त पुढे करत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने पुरस्काराच्या प्रतीक्षेत असलेले प्रगतिशील शेतकरी, आदर्श गोपालक वार्‍यावर सोडल्यागत झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार देण्यात येतात. गेल्या वर्षीही यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. मात्र पुरस्कारासाठी निवडी वेळेत न झाल्याने कृषी समितीने पुरस्कार देण्याचे टाळले होते. मागील वर्षीही पुरस्कार मिळण्यासाठी शेतकरी, गोपालकांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, पुरस्कार वितरण कार्यक्रम न झाल्याने शेतकरी, गोपालक नाराज झाले.

यावर्षी पुरस्कार वितरण कार्यक्रम  होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार पुरस्कार वितरणाची तारीखही निश्‍चित करण्यात आली होती. मात्र अचानकपणे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षातर्फे येत्या 10 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ता असल्याने काँग्रेस पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम रद्द करण्याचे फर्मान सोडले. त्याला अनुसरून सभापती अजय फटांगरे यांनी कार्यक्रम रद्द केला.

कृषी समितीत वाद?

पुरस्कारासाठी शेतकरी, गोपालकांची निवड करतांना कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत झाले नाही. नुकत्याच झालेल्या सभेत यावरून काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. पुरस्कारासाठी नावे निश्‍चित नसतांना पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्याची घाई करण्यात आली. मात्र नावेच निश्‍चित नसल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरस्कारासाठी घ्या परीक्षा

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षक निवडतांना अधिकार नसतांना जिल्हा परिषदेने शिक्षकांची परीक्षा घेतली. प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालक निवडतांना मात्र तसे झाले नाही. जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या पत्रावरूनच नावे निवडण्यात आली. त्यामुळे प्रगतिशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कारासाठीही पदाधिकार्‍यांनी परीक्षा घ्यावी असा उपहासात्मक टोला भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी लगावला.