Sat, Nov 17, 2018 12:39होमपेज › Ahamadnagar › चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई 

चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई 

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 12:51AMसंगमनेर : प्रतिनिधी

अकलापूर ग्रामस्थांच्यामदतीने गेल्या डिसेंबर महिन्यात पकडण्यात आलेले चार आरोपी विविध जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने घारगाव पोलिसांनी या चौघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी त्यास मंजुरी दिली असून या चौघांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 25 डिसेंबर 2017 रोजी पठारावरील आभाळवाडी येथे भाऊसाहेब जाधव यांच्या घरी चोरी करून पळालेल्या संतोष शिवाजी जाधव (वय 26, रा.आभाळवाडी), संदेश दत्तू धांडे (वय 30, रा.कोडेगव्हाण, ता.श्रीगोंदा), चंदर दादाभाऊ गाडे (वय 29, रा.जवळा, ता.पारनेर) व शरद बन्सी निचित (वय 21, रा.वडनेर खु., ता.शिरूर, जि.पुणे) या चौघांना अकलापूरच्या ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले होते. सदरच्या चारही आरोपींनी संघटित टोळी तयार करून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आपला आर्थिक फायदा करण्यासाठी हिंसाचार व दडपशाहीचा वापर करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आल्याची माहिती घारगावचे  पोलिस उपनिरीक्षक व तपासी अधिकारी अन्सार इनामदार यांनी दिली. सदरचे चारही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या हाती लागले आहेत. संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र थोरात यांनी केलेल्या सखोल चौकशीतून ते संघटित गुन्हेगारी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.