होमपेज › Ahamadnagar › महापालिका विद्युत विभागाचे ग्रहण सुटेना!

महापालिका विद्युत विभागाचे ग्रहण सुटेना!

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 10:11PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यापासून महापालिकेच्या विद्युत विभागाला लागलेले ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. शैक्षणिक पात्रता नसतांनाही प्रशासनाने या विभागाचा कारभार जबरदस्तीने सोपविला असून तात्काळ कार्यमुक्‍त करावे, अशी विनंती अभियंता सुरेश इथापे यांनी पुन्हा एकदा केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विभागाचा कार्यभार ठप्प असल्यामुळे शहरातील विद्युत व्यवस्था व सुविधेवर याचा गंभीर परिणाम झालेला असतांनाही यातून मार्ग काढण्याकडे आयुक्‍तांचे दुर्लक्ष होत आहे.

विद्युत विभागातील अधिकार्‍यांच्या तुरुंगवार्‍या सुरु झाल्यानंतर 15 जानेवारीला तत्कालीन आयुक्‍तांनी प्रभाग समितीनिहाय चार अभियंत्यांची नियुक्‍ती केली होती. त्यांनी नकार दिल्याने पुन्हा दोन अभियंत्यांची नियुक्‍ती करुन विभाग प्रमुख म्हणून अभियंता इथापे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचार्‍यांचा अभाव, ठेकेदारांची मनमानी, कर्मचार्‍यांची मानसिकता यामुळे विभागाची अवस्था वाईट झाल्याचा अहवाल इथापे यांनी आयुक्‍तांना दिला होता. त्यानंतरही वरीष्ठ अधिकार्‍यांनी याची कुठली दखल घेतली नाही. त्यामुळे इथापे यांनी या विभागाचे कामकाज पाहू शकत नसल्याचे पत्र देवून कार्यभार काढून घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर जून व जुलै महिन्यात त्यांनी पुन्हा पत्र देवून कार्यभार काढून घेण्याची मागणी आयुक्‍तांकडे केली होती. 

महासभेत विद्युत विभागाच्या ठप्प झालेल्या कामकाजावरुन सदस्य आक्रमक झाल्यानंतर अभियंता इथापे यांनी वस्तुस्थिती मांडली होती. आता पुन्हा एकदा इथापे यांनी आयुक्‍तांना पत्र देवून विद्युत विभागाचे कामकाज सांभाळण्यास समर्थ नसल्याचे सांगत तात्काळ कार्यमुक्‍त करण्याची मागणी केली आहे. उपायुक्‍त प्रदीप पठारे यांनी इथापे यांच्याकडील कार्यभार काढून इतर अधिकार्‍याकडे सोपविण्याबाबत प्रस्ताव सादर केला असल्याचे व तीन अधिकार्‍यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे महासभेत सांगितले होते. मात्र, अद्यापही प्रभारी आयुक्‍तांकडून नवीन अधिकार्‍याच्या नियुक्‍तीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, विद्युत विभागाचे कार्यालयीन कामकाज, शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, प्रलंबित प्रस्ताव, ठेकेदारांची रखडलेली देयके आदींवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. शहरातील विद्युत व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र असून नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे..