Sun, Apr 21, 2019 06:34होमपेज › Ahamadnagar › खासगी सावकारांच्या घरी छापे

खासगी सावकारांच्या घरी छापे

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 18 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणातील तीन व वाळकी येथील शेतकर्‍याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील एक अशा चार खासगी सावकारांच्या घरावर पोलिस व सहकार खात्याच्या संयुक्त पथकाने छापे टाकले. या छाप्यात त्यांच्या घरातून काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून, त्याची तपासणी सुरू आहे. 

उद्योक पवार आत्महत्या प्रकरणातील आरोपी नवनाथ वाघ याला गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. त्यावेळी त्याच्या घरी छापे टाकले होते. परंतु, पोलिसांच्या हाती काही ठोस लागले नव्हते. या गुन्ह्यातील इतर आरोपी कटारिया जीजी, विनायक रणसिंग, यशवंत कदम व वाळकी येथील शेतकर्‍यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला संतोष कुलट याच्या बुरुडगाव येथील घरी बुधवारी छापे टाकण्याचे नियोजन ‘एसआयटी’ने केले होते. त्यानुसार पोलिस व सहकार खात्याची चार विशेष पथके नियुक्त करण्यात आली. या पथकांनी एकाचवेळी चारही सावकारांच्या घरांवर छापे टाकले. या छाप्यात एका सावकाराच्या घरातून काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. इतर आरोपींकडे काही सापडले नाही, असे समजते. पोलिसांनी हस्तगत केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. 

पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे खासगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. खासगी सावकाराच्या त्रासास कंटाळून उद्योजक बाळासाहेब पवार यांनी आत्महत्या केली असून, या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशावरून विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाच्या नियंत्रणाखाली हा तपास सुरू असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत. ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे खासगी सावकार व वाळकी येथील शेतकर्‍यास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणारा संतोष कुलट यांचा संबंध असून, सर्व सावकारांना मदत करणारा सूत्रधार एकच असल्याचा संशय पोलिसांना आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे समजते.