Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Ahamadnagar › २९ गुरुजींची तब्येत एकदम ‘ठणठणीत’!

२९ गुरुजींची तब्येत एकदम ‘ठणठणीत’!

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या वेळेस अपंग प्रमाणपत्र जोडलेल्या 134 शिक्षकांपैकी 29 गुरुजींची तब्येत एकदम ‘ठणठणीत’ असल्याचे जिल्हा रुग्णालयाने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. या 29 गुरुजींना कारवाईची अंतिम नोटीस पाठवून कारवाई करण्यात येणार आहे. उर्वरित 105 शिक्षकांचे प्रमाणपत्र ‘ओके’ निघाल्याने त्यांच्यावरील कारवाईचे ‘बालंट’ टळले आहे.

ऑनलाईन पद्धतीने राज्य पातळीवर झालेल्या बदल्यांमध्ये चुकीची माहिती देणार्‍या 234 शिक्षकांची मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासमोर गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आली. अनेक शिक्षकांनी सादर केलेले अपंग प्रमाणपत्र जुन्या पद्धतीचे असल्याने ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी या शिक्षकांचे अपंगत्व जिल्हा रुग्णालयामार्फत तपासण्याचा निर्णय माने यांनी घेतला होता.

जिल्हा रुग्णालयात झालेल्या तपासणीत अनेक बाबी समोर आल्या. त्यामध्ये या 29 शिक्षकांना पूर्वी, मणका, मेंदू, हृदय, अपघाताने आलेले अपंगत्व होते. मात्र कालांतराने त्यांचे अपंगत्व नाहीसे झाले. अपंगत्व नाहीसे झालेले असतांनाही अनेक शिक्षकांनी जुने अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले होते. मात्र तपासणीत अपंगत्व आढळून न आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीसाठी काही शिक्षकांनी बनावट आणि चुकीचे कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतलेला आहे. अनेक शिक्षकांनी अर्ज भरतांना विविध कागदपत्रे जोडणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अर्जासोबत कागदपत्र न जोडून शासनाची एकप्रकारे फसवणूक केली आहे. अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची तालुका पातळीवर पडताळणी करण्यात आली. तालुका पातळीवर पडताळणी झाल्यानंतर जिल्हा पातळीवर फेरतपासणी करण्यात आली. फेरतपासणीनंतर दि. 6 व 7 जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली.

संवर्ग 1 मध्ये एकूण 1 हजार 156 शिक्षकांपैकी 1 हजार 6 शिक्षक पात्र ठरले असून, 150 शिक्षक अपात्र ठरलेले आहेत. संवर्ग 2 मध्ये एकूण 622 शिक्षकांपैकी 544 शिक्षक पात्र ठरले असून, 78 शिक्षक अपात्र ठरलेले आहेत. 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील शिक्षकांची सुनावणी, दुपारी 2.30 वाजता अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील शिक्षकांची, तर काल 7 जुलैला पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड व कर्जत तालुक्यातील शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी घेतांना या शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची व कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली. मात्र अनेक शिक्षकांनी अपूर्ण कागदपत्रे, खुलासे सादर केले आहेत. अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीचा लाभ घेतलेल्यामध्ये बर्याच शिक्षकांनी जुने अपंग प्रमाणपत्र सादर केलेले आहेत.

नवीन नियमानुसार अपंग व्यक्तींना आता त्यांच्या प्रमाणपत्राची ऑनलाईन नोंदणी करून दरवर्षी पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे माने यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधून तातडीने शिक्षकांसाठी शिबीर घेण्याची विनंती केली. त्यानुसार गेल्या सोमवारी जिल्हा रुग्णालयात शिक्षकांच्या अपंगत्वाची तपासणी झाली. यासह बोगस अंतर दाखविणार्‍या शिक्षकांवर उशिराने कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईओ माने यांनी सांगितले.