Sat, Jun 06, 2020 20:40होमपेज › Ahamadnagar › विद्यार्थी उघड्यावर गिरवताहेत शिक्षणाचे धडे

विद्यार्थी उघड्यावर गिरवताहेत शिक्षणाचे धडे

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 10:14PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

निंबोडी येथील दुर्घटनेनंतर तरी जिल्हा परिषद प्रशासन गतिशील काम करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. तालुक्यातील शेडगाव येथील प्राथमिक शाळा इमारत कालबाह्य झाल्याने ती धोकादायक झाली आहे. बांधकाम अभियंत्यांनी इमारत विद्यार्थ्यांना बसण्यास लायक नसल्याचा अभिप्राय दिला आहे. मात्र जिल्हा परिषदेने निर्लेखनचा प्रस्ताव फेटाळल्याने 89 विद्यार्थी झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी जिल्हा परिषदेने 1956 साली शेडगाव येथे शाळेची इमारत बांधली. सध्या इयत्ता पहिली ते सातवी या सात वर्गात 184 विद्यार्थी असून 8 शिक्षक कार्यरत  आहेत.  मागील वर्षी निंबोडीची दुर्घटना घडली आणि जिल्ह्यातील शाळांच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन करण्यात आले. यामध्ये शेडगाव शाळाचे नाव पहिल्या 50 धोकादायक इमारतींच्या यादीत होते. मात्र तरीही निर्लेखन झाले नाही हे विशेष.

आता जिल्हा परिषदेने उपअभिंयता व गटशिक्षणाधिकार्‍यांचा दाखला घसरा प्रमाण पत्र नाही अशा त्रूटी काढून शेडगाव शाळा इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव चक्क वर्षभरानंतर पुन्हा श्रीगोंदा पंचायत समितीला पाठवला आहे. त्यामुळे त्रूटीची पूर्तता होऊन निर्लेखन कधी होणार, ही इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत कधी उभी राहणार हा मोठा जटील प्रश्‍न बनला आहे. 

श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपअभिंयत्यांनी ही इमारत धोकादायक असून मुलांना शाळेत बसवू नये असे सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक मुलांना शाळेत बसवत नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना ऊन, वारा, पाऊस या संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. पाऊस आला की विद्यार्थ्याना इतरत्र धावपळ करावी लागते. जिल्हा परिषदेने धोकादायक इमारत काढून त्या जागी सहा नवीन खोल्यांची इमारत करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने यामध्ये किचकट नियमावली तयार केल्याने त्याची पूर्तता करता करता शिक्षक बेजार झाले आहेत.

किती दिवस बसणार उघड्यावर 

एकीकडे विद्यार्थ्यांना बसायला बाक, इतर सुविधा आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नाही. पूर्ण इमारत धोकादायक झाल्याने शिक्षक, विद्यार्थी इमारतीकडे फिरकत नाहीत. वर्ग खोल्यांमध्ये ठेवण्यात आलेले धान्य आणण्यासाठी संबधित शिक्षक जीव मुठीत धरुन जातात. या शाळेत तीन झाडांखाली तीन वर्ग सुरु आहेत. मात्र असे किती दिवस उघडयावर बसणार, असा प्रश्‍न चिमुकल्यांच्या मनात आहे.

..तर बेमुदत शाळा बंद 

शेडगावचे सरपंच विजय शेंडे म्हणाले, आम्ही कालबाह्य धोकादायक इमारतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी निर्लेखनचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला.पण तो त्रूटी काढून माघारी पाठविण्यात आला, हे दुर्दैव आहे.  नवीन शाळा इमारत न केल्यास शाळा बेमुदत बंद ठेवणार आहोत. कागदपत्राची पूर्तता होत असताना या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा कुणालाच अधिकार नाही.