Mon, Aug 19, 2019 06:55होमपेज › Ahamadnagar › धर्मनिरपेक्ष पक्षांशी समझोत्यास तयार

धर्मनिरपेक्ष पक्षांशी समझोत्यास तयार

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:57PMनगर : प्रतिनिधी
संविधानाला धोका असल्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत लोकसभा निवडणुकीत समझोता करायला आम्ही तयार आहोत. राज्यात काँग्रेसकडे 12 जागा मागितल्या आहेत. काँग्रेसकडून या प्रस्तावावर अद्याप आम्हाला उत्तर आलेले नाही. ते येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, समझोता न झाल्यास आम्ही सर्व जागांवर लढणार आहोत, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

 वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, अशोक गायकवाड, अशोक सोनवणे, अनंत लोखंडे, अरुण जाधव आदी उपस्थित होते.  ते पुढे म्हणाले की, बोफोर्सवरून पूर्वी ज्याप्रकारे काँग्रेसला टार्गेट केले, त्याप्रमाणे आता राफेल घोटाळ्यावरून भाजपला टार्गेट करण्यात येत आहे. अंबानींकडे विमान निर्मितीचा कारखाना नसतानाही त्यांना विमानपुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. एकीकडे पंतप्रधान ‘न खाऊंगा ना खाने दूंगा’ असे म्हणतात पण तिसर्‍याला खाण्यासाठी आपल्या ताटात घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

घराणेशाहीला आमचा विरोध नाही. मात्र, घराणेशाहीचे सामाजिकीकरण होण्याची गरज आहे. दिवसेंदिवस भाजपाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. दलित ऐक्य जर घडले असते तर, भाजप सत्तेवर आला असता का? असा उलट प्रश्न त्यांनी केला. पंतप्रधानांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना मारण्याचा विषय ही एक प्रकारची नौटंकी आहे. पंतप्रधानांवरील टीका ही कामचुकारपणावर होत आहे. टीका सहन होत नसल्यास त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विरोधीपक्ष नेते स्वतःच्या बचावात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत नसल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला. भाजपाच्या विरोधात आता सर्वत्र मोट बांधायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता वंचित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.