Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Ahamadnagar › महापालिका निवडणुकीची तयारी!

महापालिका निवडणुकीची तयारी!

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 24 2018 10:43PMनगर ः प्रतिनिधी

येत्या वर्षाअखेरीस होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी निवडणूक आयोग व मनपा प्रशासनाच्या पातळीवर सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आयोगाच्या पथकाने काल (दि.24) मनपाकडील ‘ईव्हीएम’ मशिन व स्ट्राँगरुमची तपासणी केली. मनपाने केलेल्या उपाययोजनांबाबत अधिकार्‍यांनी समाधान व्यक्‍त केले.

निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील सांख्यिकी अधिकारी मनिषा माने व त्यांच्या सहकारी ज्योती पंडीत, सुप्रिया तेंडुलकर, ज्योती पाटील या चार अधिकार्‍यांनी काल सकाळीच शहरात दाखल होऊन मनपा अधिकार्‍यांची भेट घेतली. नगरसचिव एस. बी. तडवी, अभियंता श्रीकांत निंबाळकर, संगणक विभागाचे अंबादास साळी, स्टोअर विभागाचे व्ही. बी. गोडळकर, आर. एस. वाखारे, पी. एस. वायाळ यांनी त्यांचे स्वागत केले. मनपा अधिकार्‍यांचे निवासस्थान असलेल्या त्रिदल इमारतीच्या तळमजल्यावर ईव्हीएम मशिनसाठी स्ट्राँगरुम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे करण्यात आलेल्या उपाययोजनांची अधिकार्‍यांनी पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे, ईव्हीएमच्या पेट्यांसह त्या ठेवण्यात आलेल्या जागेवर करण्यात आलेल्या कामांची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्‍त केले. एका पेटीचे सील तोडून त्यातील ईव्हीएम मशिनची तपासणीही त्यांनी केली. 

पोटनिवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या 165 ईव्हीएम मशिन मनपाकडे आहेत. मनपाने सद्यस्थितीत 600 मशिन ठेवता येतील, या दृष्टीने स्ट्राँगरुममध्ये उपाययोजना केल्या आहेत. त्याशेजारील दुसर्‍या जागेतही आणखी 400 ते 500 मशिन ठेवता येतील, अशा पध्दतीने नियोजन सुरु असल्याचे नगरसचिव तडवी, अंबादास साळी यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, डिसेंबर अखेरीस होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगाने यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांची माहिती घेतली जात असल्याने प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र आहे.