Thu, Jul 18, 2019 13:00होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात मातृवंदन  सप्ताहास सुरुवात

जिल्ह्यात मातृवंदन  सप्ताहास सुरुवात

Published On: Sep 02 2018 1:09AM | Last Updated: Sep 02 2018 1:09AMनगर : प्रतिनिधी

प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी लागू असलेल्या या योजनेच्या जनजागृतीसाठी नगर जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान मातृवंदन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या योजनेतर्ंगत 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर प्रथमच ज्या मातांची प्रसूती झाली किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांना शासनाकडून मातृ वंदना रक्कम दिली जाणार आहे. शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केलेल्या पात्र महिलांना पहिल्या जिवित अपत्यासाठी हा लाभ मिळणार आहे.

जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, योजनेचे जिल्हा समन्वयक हनुमंत गदादे आदींनी केले आहे.

या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रुपयांचा लाभ संबधित महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. एकूण तीन टप्प्यात ही रक्कमखात्यात जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर 1 हजार रुपये, किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी झाल्यानंतर तसेच गर्भधारणेस सहा महिने पूर्ण झाल्यानंतर 2 हजार रुपये, तिसर्‍या टप्प्यात प्रसूतीनंतर अपत्याच्या जन्माची नोंदणी व पहिले लसीकरण झाल्यानंतर उर्वरित 2 हजारांची रक्कमखात्यात जमा केली जाते.

सदर योजना शासकीय सेवेत असणार्‍या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे. मातृवंदना सप्ताहात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व सेवा क्षेत्रांमध्ये माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येत असल्याचे डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.