Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Ahamadnagar › नगराध्यक्ष भैलुमे पेलणार विकासाचे शिवधनुष्य

नगराध्यक्ष भैलुमे पेलणार विकासाचे शिवधनुष्य

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:30PMकर्जत : गणेश जेवरे

कर्जत शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांनी मिळविला आहे. त्या सुशिक्षित असतानाच, सासराचा राजकीय वारसा लाभल्याने कर्जत शहराच्या विकासाचे शिवधनुष्य पेलू शकतात.

कर्जत ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यानंतर झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व तालुक्याचे नेते नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 12 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आणि शहराचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांनी मिळविला. अडीच वर्षांच्या नियमाप्रमाणे पुढील आरक्षण अनुसूचित महिलेसाठी सोडतीद्वारे निघाले. कर्जतच्या पालिकेमध्ये प्रतिभा नंदकिशोर भैलुमे या एकमेव सदस्या असल्याने त्यांची वर्णी हमखास लागणार होतीच आणि ती लागली. 

प्रतिभा भैलुमे या काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या स्नुषा आहेत. पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी कॉग्रेस पक्षाकडे  प्रभाग 5 मधून उमेदवारी मागितली मात्र, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्या अपक्ष म्हणून विजयी झाल्या. निकालानंतर सौ भैलुमे यांनी सत्ताधारी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते त्यांचा विजयी सभेमध्ये सत्कार करण्यात आला. पालिकेत भाजपचे संख्याबळ 1 ने वाढून 13 झाले होते. त्यांना नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालिकेच्या विविध समित्यांवर संधी दिली होती. आरक्षण निघाल्यावर भाजपला 12 पैकी एखाद्या नगरसेवकाचा राजीनामा देवून तिथे दुसरी अनुसूचित जातीची महिला निवडून आणता आली असती मात्र त्यांनी तसे केले नाही. पहिले अडीच वर्षे भाजपबरोबर प्रामाणिक आणि निःस्वार्थी राहीलेल्या भैलुमे यांना कर्जतच्या पालिकेमध्ये पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान दिला.

प्रतिभा भैलुमे या डिप्लोमा झालेल्या आहे. त्यांचे पती नंदकिशोर हे सिव्हील इंजिनीअर असून नगरविकास विभागात नगररचनाकार पदावर कार्यरत आहेत.त्यांची दोन्ही मुले इंजिनीअर आहेत. त्यांचे वडील गटशिक्षणाधिकारी होते. आई आरोग्य विभागात अधिकारी होत्या. सासरी आल्यावर सर्व कुटूंबच सुशिक्षित मिळाले. सासुबाई मुख्याध्यापिका, सासरे हे माध्यमिक शिक्षक होते. त्यांचे दीर प्रतापराव भैलुमे हे श्रीअमरनाथ विद्यालयामध्ये उपप्राचार्य आहेत. इतर पुतणे उच्चशिक्षित आहेत. अशा प्रकारे सर्व कुटूंब सुशिक्षीत असल्याने त्याचा त्यांना काम करताना निश्‍चित लाभ होईल.

सासरी राजकीय वारसा

कर्जत व जामखेड हा संयुक्‍त मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे आमदार म्हणून विठ्ठलराव भैलुमे यांनी सन 1990 ते 95 या काळामध्ये प्रतिनिधीत्व केले. भैलुमे यांनी आमदार झाल्यावर सर्वात प्रथम कर्जत व राशीन शहराचा पाणी प्रश्‍न सोडविला. या शिवायही अनेक विकास कामे भैलुमे यांच्या काळामध्ये झाली. हाच वारसा आणि विकासाची दिशा घेवून प्रतिभा भैलुमे या पुढील अडीच वर्षे काम करणार आहेत.

विकासकामे करण्याची आव्हाने

प्रतिभा भैलुमे यांना शहरातील सर्व प्रश्‍नांची चांगली जाण आहे. यामध्येही महिलांच्या समस्या कोणत्या व त्या कशा सोडवायच्या यांची त्यांना पूर्ण कल्पना आहे. महिलांसाठी पाणी, चांगले रस्ते, आरोेग्य, स्वच्छता व सुरक्षा हे प्रश्‍न प्रामुख्याने आहे. आज कर्जत शहरासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नामदेव राऊत यांनी 28 कोटी रुपयांची खेड येथून पाणी योजना मंजूर करून अवघ्या 17 महिन्यांत कर्जतकरांना शुद्ध पाणी पिण्यास दिले आहे.याचे उद्घाटन नुकतेच झाले असून ही योजना चांगल्या रितीने कार्यान्वित करावयाची आहे. नवीन पाणी योजनेमुळे शहरातील अनेक चांगले रस्ते पुन्हा खराब झाले आहेत तर काही रस्ते चांगले होण्याची वाट पाहत आहेत. सुशोभिकरण, गार्डन अशा अनेक गरजा आहेत पूर्ण करावयाच्या आहेत.