Sun, Mar 24, 2019 12:36होमपेज › Ahamadnagar › नेवासा तालुक्यात आढळले दोन तोतया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 

नेवासा तालुक्यात आढळले दोन तोतया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 10:53PMनगर : प्रतिनिधी

नेवासा तहसील कार्यालयात आयोजित निवडणूक प्रशिक्षणात दोन तोतया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आढळून आले. या प्रकरणाने निवडणूक यंत्रणेत एकच खळबळ उडाली. निवडणूक कामासाठी नियुक्‍त केलेल्या शिक्षकांनीच (बीएलओ) या दोन तोतयांना  प्रक्षिणासाठी धाडल्याचे पुढे आले आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या चौघांची आता सखोल चौकशी होणार आहे. 

उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व तहसीलदार उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थितीत काल (दि.7) नेवासा तालुक्यातील बीएलओसाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रशिक्षण आयोजित केले होते. पहिल्या टप्प्यात 138 बीएलओ  प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या बीएलओंची ओळखपरेड झाली असता, भाऊसाहेब मिसाळ व भाऊसाहेब संतराम गायकवाड नामक दोन व्यक्‍ती बीएलओ नसल्याचे पुढे आले. मतदान केंद्र क्रमांक 193 च्या बीएलओपदी ताई गायकवाड या प्राथमिक शिक्षिकेची नियुक्‍ती केलेली आहे. या शिक्षिकेने प्रशिक्षणास उपस्थित राहाण्याऐवजी भाऊसाहेब मिसाळ या व्यक्‍तीस धाडले. मतदान केंद्र क्रमांक 103 बीएलओपदी नियुक्‍त केलेल्या श्रीमती एस.जे. शेख या प्राथमिक शिक्षिकेने भाऊसाहेब गायकवाड या इसमास प्रशिक्षणासाठी पाठविल्याचे उघड झाले आहे.

या दोन प्राथमिक शिक्षिकांनी दुसर्‍या व्यक्‍तीस प्रशिक्षणास पाठवून जबाबदारी झटकली. शासनाची फसवणूक झाल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची नियुक्‍ती केली आहे.दोषी व्यक्‍तीस लोकप्रतिनिधी अधिनियम,1950 नुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जिल्हाभरातील बीएलओंचे धाबे दणाणले आहे. या प्रशिक्षणनंतर चाचणी घेतली असता, 32 बीएलओंनी परीक्षाच गांभीर्याने घेतली नसल्याचे पुढे आले. त्यामुळे निवडणूक विभागाने या बीएलओंकडून खुलासा मागविला आहे.