Tue, Apr 23, 2019 08:12होमपेज › Ahamadnagar › पक्षांतर्गत गटबाजीने कार्यकर्ते हैराण

पक्षांतर्गत गटबाजीने कार्यकर्ते हैराण

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 10:50PMविष्णू वाघ
 

एकेकाळी राज्याच्या प्रमुख पदाच्या शर्यतीत असलेल्या श्रीरामपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर सध्या कमालीची शांतता आहे. नव्हे-नव्हे राजकीय पक्षांचे खरे वारसदार कोण? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हैराण असल्याचे चित्र आहे.

तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक ठेवून श्रीरामपूर नगरपरिषदेचा कारभार योग्य दिशेने घेऊन जाण्याबाबत अंकुश ठेवणार असल्याचे सूतोवाच केले. त्यामुळे तालुक्याच्या एकूणच राजकीय साठेमारीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

माजी आमदार मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या वर्षी झालेल्या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाआघाडीची मोट बांधण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एवढेच काय पालिकेवरील तत्कालिन माजी आ. जयंतराव ससाणे यांची सत्ता उलथावून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा आदिक या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. परंतु त्यानंतर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पक्षीय चिन्हाचा हट्ट धरला. तो महाआघाडीतील कोणत्याही घटकाच्या गळी न उतरल्यामुळे महाआघाडीचा डाव मोडला. तेव्हापासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकले उडाली. त्यात पूर्वश्रमीचे मा. आ. मुरकुटे यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली. आदिक यांनी छोट्या-मोठ्या निवडणुकांपासून अलिप्त रहाणे पसंत केल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हैराण झाले आहे. या दोन नेत्यांमधील वाद पक्षश्रेष्ठींपुढे कोण मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच सध्या तालुक्यात काँग्रेस व भाजपाची अवस्था झाली आहे. काँग्रेसचे विद्यमान आ. भाऊसाहेब कांबळे यांनी नगरपालिका निवडणुकीनंतर माजी आ. जयंतराव ससाणे यांच्याशी काडीमोड घेत सवतासुभा मांडला. त्यांना पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे यांनी भक्कम पाठिंबा देत ‘हम भी कुछ कम नही’ चा नारा दिला. दरम्यान, पालिका निवडणुकीनंतर काँग्रेसचे दोन गट होऊन एक गट समतोल विकासाचा नारा देत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे तालुक्यात एकसंघ काँग्रेसची वाताहत लागली. आ. कांबळे व माजी आ. ससाणे गटाने आपणच काँग्रेसचे खरे वारसदार असल्याचा दावा ठोकून कुरघोडीचे राजकारण सुरू केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी कार्यकर्ते मात्र दोन गटात विभागले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील दोन्ही गट मात्र राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे ना. विखे काय भूमिका घेतात यावरच येथील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी अनुकूल असल्याचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगताना दिसतात. त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन नंबरची मते मिळाल्याचा आधार आहे. दरम्यान, पक्षीय पातळीवर सुरू असलेली संघटनात्मक बांधणी ही जमेची बाजू असून माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे हे यावेळी लोकसभेची निवडणूक लढवितात की विधानसभेची याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी मोठा होमवर्क केला असून ते वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. परंतु भाजपाच्या उभारणीत मोठे योगदान असलेले ज्येष्ठ नेते हेरंब औटी हे वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन पक्षवाढीसाठी स्वतंत्रपणे काम करीत असल्याने भाजपाचा खरा गट कोणता? याबाबत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकूणच येणार्‍या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांच्या काँग्रेसविरूद्ध दोन नंबरच्या भाजपाला विजयासाठी मोठी संधी आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी हक्काचा समजला जातो. ते कार्यकर्त्यांची एकमोट कशी बांधतात, यावरच येथील राजकीय भवितव्य ठरणार आहे. तसेच भाजपाने प्रतिष्ठेचा केलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे कशी व्यूहरचना आखतात, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.