Sat, Jul 20, 2019 09:04होमपेज › Ahamadnagar › पोलिसांच्या निगराणीतील वाहनांच्या साहित्याची चोरी

पोलिसांच्या निगराणीतील वाहनांच्या साहित्याची चोरी

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:20PMराहुरी : प्रतिनिधी

राहुरी भागातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्‍त होत असताना पोलिस ठाणे परिसरातच चोरट्यांनी आपली हातसफाई दाखविल्याची घटना समोर आली आहे. जप्‍त वाहनांच्या बॅटर्‍या, टायर व स्टेपनी चोरून नेल्याची तक्रार आल्याने पोलिस ठाणेच असुरक्षित  असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था? असा प्रश्‍न केला जात आहे. महसूलनेे जप्त केलेली वाहने दंडात्मक रक्कम भरून ती सोडवून नेण्यासाठी वाहन मालक आले असता हा प्रकार उघडकीस आला. 

तालुक्यात मुळा व प्रवरानदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. वाळूतस्करांना आवरण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून आवाज उठविल्यानंतर वेळोवेळी महसूलने नदीपात्रांत छापा टाकून अवैध वाळूउपसा करणारी वाहने जप्‍त केली. दरम्यान, महसूलने गौण खनिज तस्करांची वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात उभी केली. तालुकाभरात चोरट्यांनी धुडगूस घातला असताना पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे दिसून आले. पोलिसांकडून चोरट्यांना मिळालेली मोकळीक पाहून चोरट्यांनी पोलिस ठाण्यातच हातसफाई दाखविण्याची हिंमत दाखविली. महसूलाने जप्‍त केलेली वाहने पोलिस ठाणे आवारात लावली असताना चोरट्यांनी या वाहनांची बॅटरी, टायर, स्टेपन्या चोरून नेल्याची किमया साधली. महसूलाची दंडात्मक रक्कम भरून वाहन मालकांनी वाहन ताब्यात घेण्यास पुढाकार घेतला असता वाहनांचे साहित्य चोरी गेल्याचे लक्षात आले. वाहनमालकांनी तहसीलदार अनिल दौंडे यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला.

तहसीलदार दौंडे यांनीही वाहनांची पाहणी केली असता, वाहनांच्या साहित्याची चोरी झाल्याचे त्यांनाही दिसून आले. पोलिस ठाण्याच्या आवारातून वाहनांचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार पाहून महसूल प्रशासनानेही आश्‍चर्य व्यक्‍त केले. पोलिस ठाणे आवारातून वाहनांचे साहित्य चोरीला गेल्याने वाहन मालकांसह महसूल प्रशासनही पेचात सापडले असताना अखेर तहसीलदार दौंडे यांनी वाहनमालकांशी चर्चा साधली. चर्चेनंतर तहसीलदार दौंडे यांनी वाहनचालकांना लेखी पत्र देत चोरीचा पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्याचे सूचित केलेे. वाहनमालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

चार वाहन मालकांनी केली लेखी तक्रार 

सदरच्या प्रकरणाबाबत महसूल प्रशासनाशी संपर्क साधला  असता 10 ते 11 वाहन मालकांनी वाहनांमधून साहित्य चोरीला गेल्याचे सांगितले. चर्चेवेळी 4 जणांनी उपस्थिती देत तक्रार केली. महसूल विभागाने पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याबाबतच्या सूचना संबंधित वाहन मालकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे.