Mon, Mar 25, 2019 05:29
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पोलिस उपनिरीक्षक, तीन कर्मचारी निलंबित

पोलिस उपनिरीक्षक, तीन कर्मचारी निलंबित

Published On: Aug 24 2018 12:40AM | Last Updated: Aug 24 2018 12:09AMनगर : प्रतिनिधी

श्रीरामपूर येथील सराफ आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवून, संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील एक पोलिस उपनिरीक्षक व तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरुवारी (दि. 23) तसा आदेश काढला आहे. निलंबित झालेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलिस कर्मचारी गोरक्ष शेरकर, सुभाष बोडखे, ए. के. आरवडे यांचा समावेश आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी येथील पोलिसांचे पथक श्रीरामपूर येथे 1 ऑगस्ट रोजी गेले होते. तेथे चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकासमोर श्रीरामपूर येथील सराफ गोरक्ष दिगंबर मुंडलिक यांनी विषारी औषध प्राशन केले होते. पोलिसांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप सराफांकडून केला जात होता. उपचारादरम्यान 17 ऑगस्ट रोजी सराफ मुंडलिक यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सराफ व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून संबंधित पोलिसांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मयत सराफ मुंडलिक यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील सराफ व्यावसायिकांनी घेऊन बंद पाळला होता.  

त्यावेळी दोषी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन श्रीरामपूर येथील पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले होते. त्यानंतर सराफांनी बंद मागे घेऊन मयत मुंडलिक यांचा अंत्यविधी केला होता. त्यानंतर वाघचौरे यांनी प्राथमिक चौकशी करून लेखी अहवाल पोलिस अधीक्षक शर्मा यांना सादर केला. त्यानुसार शर्मा यांनी गुरुवारी पोलिस उपनिरीक्षक निकम यांच्यासह तीन कर्मचार्‍यांना निलंबित केल्याचा आदेश काढला आहे.