Mon, Jul 22, 2019 02:41होमपेज › Ahamadnagar › कर्जतमध्ये पोलिसांकडून दडपशाही

कर्जतमध्ये पोलिसांकडून दडपशाही

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:21AMकर्जत : प्रतिनिधी

चौंडी येथील गोंधळ प्रकरणी 52 आरोपींना काल (दि. 1) कर्जत येथील न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी न्यायालय परिसरात पोलिसांनी दडपशाही करीत व्यापार्‍यांना त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. न्यायालय परिसराची नाकाबंदी केली. विशेष म्हणजे परिसरातील रहिवाशांनाही घरात बसण्यास सांगितले. 

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये धनगर समाजास आरक्षणाची मागणी करण्यार्‍या डॉ. इंद्रकुमार भिसे, सुर्यकांत उर्फ सुरेश कांबळे व इतर अशा 51 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जामखेड येथील न्यायाधीश रजेवर असल्याने या सर्व आरोपींना कर्जत येथील न्यायालयामध्ये आणण्यात आले होते. 

यामध्ये 17 आरोपींना कर्जत येथील कोठडीत ठेवण्यात आले होते. 16 जणांना जामखेडला कोठडीत ठेवण्यात आले होते. कर्जत येथे ठेवलेल्या सुर्यकांत कांबळे व इतर आरोपींना दुपारी 3 वाजता दोन पोलिस व्हॅनमध्ये न्यायालयात आणण्यात आले. आरोपींना आणल्यावर बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी परिसराची नाकाबंदी केली. व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. न्यायालयामध्ये कामासाठी आलेल्या व इतर स्थानिक नागरीकांना हाकलून दिले.

आम्ही काल चौंडी येथे काय केले, ते पाहिले आहे, तसे आज करायला लावू नका, असे म्हणत पोलिसांनी नागरिकांना हातातील दांडके दाखवून  दहशत केली. कर्जत येथील न्यायालय भरवस्तीमध्ये आहे. तेथे नागरिकांचा सतत वावर असतो. मात्र पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांवर करण्यात येत असलेल्या दादागिरीचा नागरिकांनी निषेध केला. जामखेड कोठडीत असलेल्या डॉ. इंद्रकुमार भिसे व इतरांना सांयकाळी चार वाजता कर्जत न्यायालयामध्ये आणण्यात आले होते.

पोलिसांची निष्क्रियता

आरोपींना न्यायालयात नेले असता न्या. धनाजीराव पाटील यांनी आरोपींच्या वैद्यकिय तपासणीची कागदपत्रे जोडली नसल्याचे तपासी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी कागदपत्रे जामखेडलाच राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरोपींना सुमारे अडीच तास न्यायालयाच्या आवारामध्ये ताटकळत बसावे लागले. कागदपत्रे आणल्यावर आरोपींच्या जामीनावर सुणावनी सुरू झाली. या प्रकाराने पोलिसांच्या निष्क्रियतेची  चर्चा न्यायालयाच्या आवारात रंगली होती.