Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Ahamadnagar › पोलिस निरीक्षकास मागितली १० लाखांची खंडणी

पोलिस निरीक्षकास मागितली १० लाखांची खंडणी

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 10 2018 12:11AMकोपरगाव : प्रतिनिधी

कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना जिवे मारण्याची धमकी देत, 10 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली.  कडनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कैलास देवराम कोळपे (रा. कोळपेवाडी ता.  कोपरगाव) असे खंडणी मागणार्‍या आरोपीचे नाव आहे.  याबाबतची कडनोर यांनीच पत्रकारांना दिलेली माहिती अशी, आरोपी  कैलास  कोळपे याच्या विरोधात धारणगाव शिवारात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्याने आपण पोलिस कर्मचार्‍यांसह त्याच्या घराची झडती घेतली. त्यावर आरोपीने आपणाला मोबाईल वरून ‘तू मला ओळखत नाही का? मला कैलास कोळपे म्हणतात.

मी भाई आहे. माझ्याजवळ कट्टा आहे. तू माझ्या घरी कशाला गेला होता? तू गणेश कोळपे याच्यावर का कारवाई केली? आता मला तू नडला आहेस, मी तुला जगू देणार नाही. आता मी मंत्रालयात असून, तुला आता मी मंत्र्यांना सांगून निलंबित करतो. तुला निलंबित व्हायचे नसेल तर, दहा लाख रुपये घेऊन ये’, अशी दमदाटी करून अश्‍लील व उद्धट भाषेत शिवीगाळ केली.  

तसेच पोलिस नाईक अशोक शिंदे यांनाही दरोड्याची केस टाकल्याबद्दल धमकी दिली आहे. कोळपे हा काही दिवसांपूर्वी तडीपार  होता. त्याने तडीपारीला स्थगिती आणली आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, घरात घुसून पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहेत. तसेच वेळापूर येथील तलाठी शिंदे व ढोर्मारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.  जामखेड व नगर येथे दुहेरी हत्याकांड झाल्याने जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या झडत्या घेण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही कोळपे यांच्या घरी गेलो असता, त्याने मोबाइलवरून वारंवार धमकी देत खंडणी मागितल्याचे कडनोर यांनी पत्रकारांना सांगितले. पुढील तपास अशोक कुसाळकर करीत आहे.